26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeDapoliदापोलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून…

दापोलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून…

अंगावर लोखंडी पाटा बांधून त्याला विहीरीत ढकलून दिले.

दापोलीत पत्नीनेच पतीचा खून केला आणि त्यानंतर तो बेपत्ता असल्याचा बनावही रचला. मात्र दापोली पोलीसांनी अवघ्या काही तासांत या खुनाचा छडा लावत सदर महिलेला पकडले आणि पोलीसी हिसका दाखविताच तिने खुनाची कबुलीही दिली. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने कथित प्रियकराच्या मदतीने तिने आपल्या नवऱ्याचा खून करत मृतदेह विहिरीत ढकलून दिला अशी माहिती पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी पत्रकारांना दिली. नेहा निलेश बाक्कर असे या संशयित आरोपी महिलेचे नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. दापोलीलगत असलेल्या गिम्हवणे गावात हा प्रकार घडला आहे.

केश कर्तनाचा व्यवसाय – पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की, दापोली शहराला लागूनच असलेल्या गिम्हवणे गावातील दापोली-हर्णे मार्गावर निलेश उर्फ बाळू बाक्कर हे केश कर्तनालयाचा व्यवसाय करत असत. त्यांची पत्नी नेहाचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधाला तिचा नवरा निलेश बाक्कर हा विरोध करत होता. म्हणून पत्नी नेहा हिने तिच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने आपला पती निलेश ऊर्फ बाळू बाक्कर याचा प्रियकराच्या मदतीने खून केला.

लापता असल्याचा बनाव – खून केल्यानंतर आपला पती बेपत्ता असल्याचा बनाव रचत तिने दापोली पोलीस स्थानकात येवून तक्रारदेखील नोंदवली. मात्र पोलीसांच्या चाणाक्ष नजरेतून ती काही सुटली नाही. पोलीसांना संशय आला आणि तो मी नव्हेच अशा प्रकारचा तिचा बनाव अखेर उघड झाला आणि खुनाला वाचा फुटली.

दोघांनाही अटक – पोलीसांनी अवघ्या काही तासांत हा बनाव उघड करत खुनाच्या आरोपाखाली नेहा निलेश बाक्कर आणि तिचा कथित प्रियकर मंगेश चिंचघरकर या दोघांनाही अटक केली आहे. मंगेश चिंचघरकर हा पालगडचा रहिवासी असून एस. टी. महामंडळात तो चालक म्हणून नोकरीला आहे.

पती बेपत्ता असल्याची तक्रार – याबाबत दापोली पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, गिम्हवणे उगवतवाडी येथे राहणारी सौ. नेहा निलेश बाकर हीने आपले पती निलेश दत्ताराम बाक्कर हे बेपत्ता असल्याबाबतची तक्रार १४ जानेवारी २०२५ रोजी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली. निलेश ऊर्फ बाळू बाक्कर याचा पोलीस शोध घेवू लागले. सौ. नेहा निलेश वाक्कर ही ज्या हॉटेलमध्ये काम करत होती तेथून कामावरुन ती रात्री ११.३० वाजता घरी आलेली होती. तिने दिलेली खबर आणि सांगितलेली वेळ यामध्ये पोलीसांना तफावत आढळली आणि तोच धागा पकडून पोलीसांनी शोधमोहिम हाती घेतली.

दारू पाजली आणि – त्याअनुषंगाने तपास सुरू असताना निलेश बाक्कर यांचा मोठा भाऊ आणि नेहाचा दीर दिनेश दत्ताराम बाक्कर यांच्याकडे पोलीसांनी चौकशी केली. त्यांनी व्यक्त केलेल्या संशयातून अधिक तपास करताना नेहाने संशयित आरोपी आणि तिचा कथित प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोघांनी निलेश बाक्करला हर्णे बायपास रोडजवळ मोकळ्या जागेत नेवून दारू पाजली आणि त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आले अशी माहिती दापोलीचे कर्तव्यतत्पर आणि या खुनाला वाचा फोडणारे पोलीस निरिक्षक विवेक अहिरे यांनी पत्रकारांना दिली.

विहिरीत ढकलून दिले – या दोघांनी निलेश बाक्कर हा ठार झाल्याची खात्री पटताच त्याला एका चारचाकी वाहनातून पालगड पाटीलवाडी येथील रस्त्यालगतच्या विहीरीत त्याला ढकलून दिले. त्याच्या अंगावर लोखंडी पाटा बांधून त्याला विहीरीत ढकलून दिले असे पोलीस चौकशीत नेहा आणि चिंचघरकर यांनी सांगितल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. मात्र पोलीस तपासात सारे उघड होताच दापोली पोलीसांनी याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, यांना सदर हकिगत कळविली.

दापोली पोलीसांचे यश – त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या सूचनांनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी औटी, पोलीस निरीक्षक विवेक अहीरे, सपोनि प्रविण देशमुख, पोउनि राजकुमार यादव, सपोफौ/७२७ अशोकगायकवाड, पोहेकॉ/१७८ अभिजित पवार, पोकों/४४० विकास पवार, पोकॉ/७४० सुहास पाटील, पोकों/३४५ सुरज मोरे, पोकॉ/१८८ रोहीत लांबोरे, पोकॉ/२०८ मिथुन मस्कर, पोकों/२४७ ज्ञानेश्वर मडके, चापोकॉ/४६७ गमरे, पोना/१५५६ वळवी यांनी पालगड पाटीलवाडी येथे जावून रस्त्यालगत असलेल्या विहिरीची पाहणी केली.. विहिरीमध्ये मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. तो मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीतून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह निलेश दत्ताराम बाक्कर (रा. गिम्हवणे उगवतवाडी, ता. दापोली) याचाच असल्याचा त्याचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाक्कर याने पोलीस आणि पंचांसमक्ष ओळखला.

दोरीने गळा आवळला – मृतदेहाची पाहणी केली असता अंगावर नायलॉन दोरीने तुटलेले लोखंडी पाटे बांधलेले असल्याचे दिसुन आले व मृताच्या गळ्यावर देखील दोरीने फास आवळ्याच्या खुणा दिसुन आल्या. यावरून दापोली पोलीस ठाण्यात दाखल बेपत्ता व्यक्ती निलेश दत्ताराम बाक्कर याचा नेहा निलेश बाक्कर (रा. गिम्हवणे), व तिचा कथित प्रियकर संशयित आरोपी मंगेश शांताराम चिंचघरकर (रा पालगड) यांनी निलेश दत्ताराम बाक्कर (वय ३७ वर्षे, रा. गिम्हवणे) याचा खून केला असल्याबाबतची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात नेहा निलेश बाक्कर आणि मंगेश चिंचघरकर या दोन संशयित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलीसांनी सांगितले. अवघ्या काही तासांतच पोलीसांनी हा सारा प्रकार उघड करत आरोपींना अटक केल्याने दापोली पोलीसांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. संशयीत आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने खूनाच्या धक्कादायक प्रकारातीलं संशयीत आरोपी नेहा निलेश बाक्कर तसेच मंगेश चिंचघरकर यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

अनेकजण हळहळले – निलेश ऊर्फ बाळू याचा दापोली शहराला लागूनच अगदी हम रस्त्यावर गिम्हवणे येथे सलून असल्याने तो येथील सर्वाच्याच परिचयाचा होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा निलेश याला बाळू म्हणूनच सर्वजण ओळखत. अशा या निलेश ऊर्फ बाळूचा मंडणगड तालुक्यातील वेळास येथील नेहा या युवतीशी १६ वर्षापूर्वी विवाह्न झाला होता. या उभयतांना दोन मूली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular