ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावस बसस्थानक इमारतीला बसवण्यात आलेली सिलिंग टप्प्याटप्प्याने पडू लागले आहे. बसस्थानकांतर्गत गटारावरील झाकणे तुटू लागली आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रवासी जनतेकडून होत आहे. पावस बसस्थानक इमारत व परिसर सुसज्ज व्हावा तसेच येणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने एमआयडीसीअंतर्गत एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर परिसरातील संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले. बसस्थानकाची इमारत पूर्णपणे न पाडता त्याच भिंतीवर बांधकाम करून इमारत बांधण्यात आली. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुसज्ज दिसण्यासाठी संपूर्ण बसस्थानकाला करण्यात आले. सिलिंग त्यामुळे प्रथमदर्शनी लोकांना काम चांगले झाल्याचे दिसले; परंतु सहा महिन्यातच हे सिलिंग तुटू लागले आहे.
त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या गटारांवर सिमेंटची झाकणे टाकून बंदिस्त करण्यात आली; परंतु ती तुटू लागल्यामुळे ही गटारे धोकादायक झाली आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. याबाबत प्रवासी राजाराम कीर म्हणाले, या बसस्थानकाचे काम चांगले झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी सहा महिन्यांमध्येच दर्जाहीन काम झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिलिंग तुटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर गटारावरील सिमेंटची झाकणे तुटल्यामुळे प्रवासी गटारात पडण्याचा धोका आहे.