शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसातील विद्यार्थ्यांचे अन्यत्र स्थलांतर करून इमारतीचा अनधिकृत वापर थांबविण्यात आला असल्याने आमरण साखळी उपोषण थांबवावे असे लेखी पत्र राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन गुरूवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा उपोषणकर्ते अमोल सोगम व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो ती मागणी पुर्ण झाल्याने आम्ही उपोषण स्थगित करत असल्याचे सोगम यांनी जाहीर केले. उपोषणाची सांगता होताच महापुरूष मंदिरात महाआरती करण्यात आली. गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थानिक ग्रामस्थ, विविध हिंदुत्ववादी संघटना पदाधिकारी, भाजपासह अन्य राजकिय पक्षाचे पदाधिकारी व या उपोषणाच्या समर्थनार्थ तालुक्यातील विविध भागातून आलेले कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अमोल सोगम व स्थानिक ग्रामस्थांनी तुर्तास हे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.
इमारत पाडा – या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्यात आले असून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात आला आहे, असे प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. मात्र सदरची अनधिकृत इमारत पाडावी अशी आमची आग्रही मागणी असून तुर्त प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण स्तगित केले असून सदरची अनधिकृत इमारत पाडण्यासाठी आमचा लढा सुरू रहाणार असल्याचे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांनी स्पष्टपणे सांगितले.
२६ जानेवारीपासून उपोषण – शहरालगतच्या घोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसातील विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी २६ जानेवारी पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले होते. गेले ५ दिवस हे उपोषण सुरू होते. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत, तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी घेतला होता. या उपोषणाला भाजपासह शिवसेना, उबाठा या पक्षांसह विविध हिंदु संघटनांनी जाहीर पाठींबा दिला होता.
प्रशासनाने घेतली दखल – अखेर प्रशासनाकडूनही याची दखल घेतली. मदरसा चौकशी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समि तीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सदरच्या मदरसातील मुलांन’ स्थलांतरीत करून इमारतीचा अनधिकृत वापर बंद करण्यात यावा अशी कारणे दाखवा नोटीस दारूल हबीब जनरल एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट यांना शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली होती. या नोटीसीमध्ये सदरचा मदरसा अनधिकृत असल्याचे नमुद करताना मदरसा चालविण्यासाठी वक्फ बोर्ड वा धर्मादाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे नमुद करत याबाबत खुलासा करावा अन्यथा मदरसा बंद करणेबाबत कारवाई केली जाईल असे नमुद केले होते.
‘उपोषण मागे घेण्याची विनंती – दरम्यान समिती अहवालावर चर्चा करून व उपोषणाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार विकास गंबरे व राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी बुधवारी रात्री उशीरा उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याच्या – विनंतीचे पत्र दिले. आपल्या मागणीप्रमाणे पन्हळे तर्फे राजापूर गट क्रमांक ५१ हिस्सा नं. १ येथील इमारतीमधील विद्यार्थी हे स्थलांतरीत झालेले असुन इमारतीचा अनधिकृत वापर थांबलेला आहे, तरी आपण आपले साखळी उपोषण थांबवावे असे लेखी पत्र प्रत्यक्ष उपोषणस्थळी जाऊन तहसीलदार यांनी दिले होते.
उपोषण स्थगित – प्रशासनाच्या या विनंतीला मान देत गुरूवारी सकाळी ११ वाजता सर्व स्थानिक ग्रामस्थांसह उपोषणाला पाठींबा देत सहभागी झालेल्या म ान्यवरांच्या तसेच महिला व विविध संघटनांच्या उपस्थितीत आपले साखळी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा अमोल सोगम यांनी केली. यानंतर समस्त हिंदू बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील श्री महापुरुष मंदिरात महाआरती करून या उपोषणाची सांगता झाली.
अनेकांची उपस्थिती – याप्रसंगी अमोल सोगम यांच्यासह ग्रामस्थ अमोल सोगम, पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ. सुयोगा जठार, कोषाध्यक्ष विवेक गुरव, महादेव गोठणकर, दादा मराठे, सुरज पेडणेकर, सुहास मराठे, शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख कमलाकर कदम, पं. स. चे माजी सभापती सुभाष गुरवे, सुशांत मराठे, संदीप चव्हाण, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दीलीप गोखले, नेत्रा गोखले सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमकर, रिफायनरी विरोधी संघटनेचे अमोल बोळे, काशिनाथ गोरले, आदिसह हिंदू संघटनांचे पदाधिकारी व समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपविभागिय अधिकारी यशवंत केडगे, राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांसह पोलीस कर्मचारी गेलें ५ दिवस या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राजापुरात तळ ठोकून होते.