परशुराम घाटातील मारहाण प्रकरणाशी काहीही संबंध नसताना गेले ५४ दिवस आमची मुले कोठडीत आहेत. त्यांना पुरेसे अन्नही दिले जात नाही, त्यांना त्वचा रोग झाला आहे. आमच्या मुलांना यात नाहक गोवलेयं, असा टाहो ३ संशयितांच्या मातांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत फोडला. मुख्य आरोपींना तातडीने पकडा, आमच्या मुलांची सुटका करा, त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या; या मागण्यांसाठी आपण नातेवाईकांसह ५ फेब्रुवारीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. चिपळूण शहरातील खंड येथील नफीसा ईनामदार, गोवळकोटरोड येथील जरीना दळवी, पेठमाप येथील अनिसा अलवारे, सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत पत्रकार परिषदेत सादर केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता परशुराम घाटात मारहाणीचा प्रकार घडला.
या प्रकरणी ७ रोजी पहाटे ३.३३ वाजता १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून निहाल ‘सईद अलवारे, शहबाज सिद्दीक दळवी, मुजफ्फर ईनामदार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करून न्यायालयात हजर केले. १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली. त्यानंतर जामिनासाठी अर्ज केला असता अन्य आरोपी अद्याप न मिळाल्याने जामीन फेटाळण्यात आला. आरोपीला पोलीस का पकडत नाहीत असा सवाल करत आमची मुले ५४ दिवस कोठडीत असून मूळ आरोपी बाहेर फिरून मौजमजा करीत आहेत, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आज अनेक सुविधा असतानाही पोलीस या आरोपींना का पकडत नाहीत, असा आमचा प्रश्न असून मूळ आरोपींची दुकाने येथे सुरू आहेत. त्यामुळे ते कामगार, कुटुंबाच्या संपर्कात नाहीत, असे होऊ शकत नाही. त्यामुळे तपासाबाबत संशय येत असल्याचा आरोपही शाहनवाज शाह यांनी पत्रकार परिषदेत केला. न्याय न मिळाल्यास ५ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.