रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात येत आहेत. या आधी नुकत्याच केलेल्या ई-केवायसीचे काय झाले? पुन्हा, पुन्हा केवायसी करण्यास कार्डधारकांना का भाग पाडले जात आहे, असा सवाल कार्डधारकांतून केला जात असून, याबाबतचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव दुकानामधून अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटुंबीय लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकीकरण ई-केवायसी करून घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या आधी नोव्हेंबर २०२४ मध्ये रेशन कार्डधारकांनी रास्त भाव दुकानदारांकडे जाऊन ई-केवायसी केली होती. दोन ते तीन महिने उलटले नाहीत एवढ्यात पुन्हा ई-केवायसी करण्याच्या सूचना शासनाकडून दिल्या जात असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रेशनकार्डवर जेवढी नावे आहेत, त्या लाभार्थी यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रक्रिया असल्याने एकाचवेळेस ई-केवायसी पूर्ण होईल की नाही, याबाबत ही शाश्वती नाही. कारण, नेहमीच (नेटवर्क) सर्वर डाऊन होण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार आहे. तसेच लाभार्थी यांना दूरवरून यावे लागत असल्यामुळे आर्थिक भूर्दंडही सोसावा लागणार आहे, तसेच मानसिक त्रासदायक ठरत असून, कांही लाभार्थी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेलेले असल्याने याच कामासाठी पुन्हा, पुन्हा येणे न परवडणारे असल्याचे म्हटले जात आहे. ई-केवायसी केली नाही तर लाभार्थी यांना अन्नधान्न मिळणार नाही. त्यामुळे या आधी लाभार्थी यांनी ई-केवायसी केली होती. त्याचे काय झाले? याला जबाबदार कोण? अशी विचारणा शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांच्याकडून केली जात आहे.