विधानसभेत महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर नागरिकांचे आभार मानण्यासाठी शनिवारी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर आभार सभा रत्नागिरीत होत असून यानिमित्ताने रत्नागिरीत म ोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ५० हजार नागरिक या सभेला उपस्थित राहतील असा दावा शिवसेनेने केला आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भगवामय वातावरण करण्यात आले आहे. ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्यात येत असून दोन माजी आमदारांसह जि. प. चे माजी पदाधिकारी, माजी जि. प. चे अध्यक्ष, पंचायत समिती आणि जि. प. चे माजी सदस्य यांच्यासह शिवसेना ठाकरे गटातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शिवसैनिक, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य असे १००० जणं शिवसेनेचा धनुष्यबाण ना. एकनाथ शिंदे यांच्याहस्ते स्विकारत पक्षात प्रवेश करणार आहेत.
चंपक मैदानावर सभा – शनिवारी १५ फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता रत्नागिरी शहरालगतच्या चंपक मैदानावर ही भव्यदिव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. तेथे मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. मंडणगडपासून राजापूरपर्यंत जिल्ह्यातील ५० हजार लोकं या सभेला उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.
जोरदार शक्तिप्रदर्शन – रत्नागिरीत शिवसेनेचे २ मंत्री आहेत. प्रत्येक जि. प. गटातून १००० नागरिक/शिवसैनिक येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात यासाठी शेकडो बसेस आणि कार, ट्रॅक्स बुक करण्यात, आल्या आहेत. शिवसेनेचे हे जबरदस्त असे शक्तिप्रदर्शन असेल, असा दावा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केला आहे.
ठाकरे गटाला खिंडार – ना. या सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील उबाठाचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी यांच्यासह शेकंडो कार्यकर्त्यांनी उबाठाला रामराम ठोकत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. तेव्हापासून सुरू झालेले हे ‘ऑपरेशन टायगर’ अजूनही सुरूच असून त्याचाच एक भाग म्हणून गुरूवारी ठाण्यामध्ये राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.
१ हजार लोकांचा प्रवेश – या पार्श्वभूमीवर शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या या आभार सभेत राजापूरपासून मंडणगडपर्यंत ठाकरे गटातील बहुसंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी असे किमान १ हजार लोकं शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतील.
कदम, बनेंचा प्रवेश – शनिवारी प्रवेश करणाऱ्यांची बरीच मोठी यादी असून त्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार सुभाष बने, त्यांचे सुपुत्र आणि जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, राजापूरचे माजी आमदार गणपतराव कदम यांचा समावेश आहे. राजन साळवींचे अनेक समर्थकदेखील शनिवारी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, असा दावा करण्यात आला आहे.
जंगी तयारी – उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या या आभार सभेची जंगी तयारी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजता ही सभा होणार असून भला मोठा शामियाना उभारण्यात आला असून परिसरात भगवे झेंडे आणि बॅनर्स यांनी सारा परिसर भगवामय करण्यात आला आहे.