मौजे आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या विहिरीत गवारेडा पडला होता. त्याला पाहण्यासाठी अवघे गाव विहिरीभोवती गोळा झाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने विहिरीच्या बाजूने एक मोठी चर पाडली. भयभीत झालेला गवा त्या चरीतून सुखरूप बाहेर पडला. विशेष म्हणजे त्याच परिसरात आणखी एक गवारेडा थांबलेला होता. विहिरीतील गवारेडा बाहेर आल्यानंतर दोघे एकत्र जंगलात गेले; मात्र विहिरीमध्ये पडलेला गवारेडा बाहेर येईपर्यंत दुसऱ्या गवारेड्याने वाट पाहिली हे विशेष मौजे आगवे येथे प्रीतम विचारे यांची जमीन आहे. त्या जमिनीत जुनी विहीर आहे. विहिरीला बारमाही पाणी असते. या पाण्याचा वापर गुरांना पाणी पिण्यासाठी केला जातो. आज सकाळी सौरभ गावणंग हा तरुण गुरांना घेऊन त्या विहिरीकडे गेला होता. विहिरीतून जोरात आवाज येऊ लागला तसेच त्याच परिसरात दुसरा गवारेडा थांबलेला होता. त्याला पाहून सौरभ गावणंग घाबरला आणि तो घरी आला. त्याने घरच्या लोकांना ही माहिती दिल्यानंतर राजेंद्र गावणंग, संजय गावणंग, विनय गावणंग आणि गावातील इतर लोकं त्या ठिकाणी जमा झाले.
त्यांनी विहिरीत डोकावल्यानंतर त्यांना गवारेडा दिसला. डोके पाण्याच्या बाहेर ठेवून बाहेर येण्यासाठी विहिरीत गोल फिरणाऱ्या गव्याला पाहून त्यांचेही मन हेलावले. गावचे सरपंच, पोलिस पाटील व ग्रामपंचायत सदस्यांना या घटनेची माहिती दिली. गवारेडा विहिरीत पडल्याचे समजल्यानंतर त्या परिसरातील गावातील लोक त्याला पाहण्यासाठी जमा झाले. असाहाय्यपणे व भेदरलेल्या नजरेने काठावरच्या बघ्यांकडे तो बघत होता. त्यानंतर वनपाल उमेश आखाडे, वनरक्षक अनंत मंत्रे घटनास्थळी दाखल झाले. विहिरीच्या एका बाजूने मोठी चर मारण्यात आली. चर मारण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी काही अंतरावर दुसरा रेडाही थांबला होता. तेथे कोणती दुसरी घटना घडू नये म्हणून गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी लोकांना बाजूला केले. वनविभागाने मारलेल्या मोठ्या चरीतून गवारेडा सुखरूप बाहेर आला. त्यानंतर तेथे थांबलेला गवारेडा आणि विहिरीतून बाहेर आलेला गवारेडा दोघेही एकत्र जंगलाकडे निघून गेले.
चिखलामुळे प्रयत्न अपुरे – ही विहीर फार खोल नव्हती. त्यातून बाहेर पडण्यासाठी गवारेडा प्रयत्न करत होता; मात्र विहिरीत चिखल असल्यामुळे तो सारखा घसरत होता. त्याला बाहेर पडता येत नव्हते. जेसीबीने चर मारल्यानंतर हा गवारेडा त्यातून बाहेर आला आणि त्याने जंगलाची वाट धरली.