पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा, पोलिस दल सक्षम आहे. अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलिसदलाचे कौतुक केले. मात्र, याच कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांना चिमटे काढत बंदोबस्त किंवा अन्य कामगिरीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष सध्या मोबाईलमध्ये असते. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचा मोबाईल कायम खिशात राहिला पाहिजे. सध्या पोलिसांचा दरारा वाटत नाही, असा सल्ला दिला. पोलिस दलाच्या कार्यक्रमात दोन्ही लोकप्रतिनिधींच्या परस्पर विरोधी वक्तव्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. रत्नागिरी पोलिस दलामार्फत ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम, १० स्कॉर्पिओ व १४ ई-बाईक’ यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सोहळा झाला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, विलास चाळके, अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, अक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नुकताच छावा नावाचा बॉलिवूडपेक्षा जास्त कमाई करणारा चित्रपट आला. त्यावर या समाजकंटकांनी पोस्ट टाकून तेढ निर्माण केली. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आधुनिक शस्त्रामध्ये ताकद आहे. तसेच समाजात तेढ निर्माण करण्याची ताकद मोबाईलमध्ये आहे. आधुनिक तंत्राचा वापर चांगला झाला पाहिजे. पोलिस दलावर विश्वास हवा, यासाठी दलाने आपली कामगिरी उंचावली पाहिजे. दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत; परंतु मोजकेच लोक पोलिस दलाला बदनाम करतात. अशा बदनाम करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केले पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी निवळी येथील आंदोलनावेळचा किस्सा सांगताना सामंत म्हणाले, खऱ्या अर्थाने पोलिसांनी माझ्या राजकारणाला सुरुवात करून दिली. त्यांनी आमचे काम करो न करो पोलिसांची भूमिका फार मोठी आहे.
याप्रसंगी आमदार जाधव म्हणाले, माझ्या कोकणात हुंड्यासारख्या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे येथील वातावरण सुरळीत आहे. पोलिस अधिकाऱ्यांबाबत मला वाईट अनुभव आलेला आहे. चांगला अधिकारी असे एखाद्याचे कौतुक केले, तर त्याची लगेचच बदली केली जाते. पण, आपले पालकमंत्री मजबूत आहेत. ते तुमची बदली होऊ देणार नाहीत. मात्र, पोलिस सेवा बजावताना अनेकवेळा मोबाईल पाहताना दिसतात. त्यांना विनंती आहे की, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचा मोबाईल खिशात असला पाहिजे.
ई-बाईकचा असा होईल वापर – नागरिकांचे जीवनमान रत्नागिरी पोलिस दलामार्फत व्हिजिटर सुखकर करण्यासाठी मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीचा वापर करण्यात येणार असून, यासाठी दहा चारचाकी वाहनांचा गुन्हे प्रतिबंध व पेट्रोलिंगकरिता वापर, तसेच ई-बाईकच्या माध्यमातून सागरी गस्त करण्यात येणार. तसेच पर्यटक सुरक्षितता आणि दुर्घटना प्रतिबंधकरिता वापर होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी प्रस्तावनेतून स्पष्ट केले.