पुढील वर्षात कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीबाबत हमी दिली जात नाही तोपर्यंत कामगिरी शिक्षक म्हणून काम करणार नाही, असे रत्नागिरी जिल्हा कंत्राटी शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला निवेदनाद्वारे कळवले आहे तसेच कंत्राटी शिक्षकांवर कोणतीही कारवाई प्रशासनाने केली तर आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार डी.एड्., बी.एड्. धारकांना २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला होता; परंतु शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयामुळे या स्थानिक शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी झाली नसली तरीही भविष्यात नवीन शिक्षक भरती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने शिक्षक नसल्यामुळे स्थानिक डी.एड्., बी.एड्. धारकांना तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती दिली गेली. त्यामुळे शिक्षण विभाग सावरला आहे. अजूनही जिल्ह्यात १ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. काही शाळा शून्य शिक्षकी आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल तर या जिल्ह्याला स्थानिक शिक्षकांची गरज आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे तेराशे नवीन कायम शिक्षकांची नियुक्ती केली होती. गेल्या काही दिवसांत शासनाने शिक्षकांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत.
त्यामुळे तात्पुरती सोय म्हणून कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या शिक्षकांना कामगिरीवर काढत अधिक पटाच्या शाळांमध्ये नियुक्ती दिली आहे. कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती ही दहा पटांपेक्षा कमी शाळांमध्ये करावयाची आहे; मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने शासन निर्णयाचे पालन केलेले नाही. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात कंत्राटी शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्तीचे लेखी आदेश मिळत नाहीत तोपर्यंत १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयाचा निषेध म्हणून कामगिरी शिक्षक म्हणून काम करणार नाहीत. तसेच कंत्राटी शिक्षकांवर कोणतीही कारवाई प्रशासनाने केल्यास जिल्ह्यातील सर्व कंत्राटी शिक्षक आंदोलन करतील, असा इशारा रत्नागिरी जिल्हा कंत्राटी शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.