वाटद एमआयडीसीसाठी भूमिअभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त मोजणीला विरोध झाला असला तरी सोमवारी (ता. २४) पोलिस बंदोबस्तात मोजणी केली जाणार आहे. सुमारे ९०० एकर जागा संपादित करण्यात येणार असून, या ठिकाणी संरक्षण मंत्रालयाचा शस्त्र बनवण्याचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रोजगारनिर्मितीच्यादृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचे पाऊल उचलले आहे. धीरुभाई अंबानी यांच्या डिफेन्स क्लस्टरमधून देशाच्या संरक्षणाचा प्रदूषणविरहित प्रकल्प रत्नागिरीत होणार आहे. त्यासाठी जागेची निवड निश्चित झाली असून, रत्नागिरीतील या प्रकल्पातून देशाच्या सैनिकांना शस्त्र पुरवण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून रोजगार मिळणार आहे. गुरुवारी (ता. २०) तालुक्यातील वाटद एमआयडीसीसाठी भूमिअभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त मोजणीला कळझोंडी येथे गेले होते; परंतु या मोजणी प्रक्रियेला ग्रामस्थांनी विरोध केला.
भूसंपादनासाठी आपण सहकार्य करणार नाही, असे स्थानिकांनी ठणकावले. त्यामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनीची मोजणी करता आली नाही; परंतु या परिसरातील एका खासगी कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी परतले. भूमिअभिलेख विभागाकडून १२ फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठीची नोटीस काढली. ती नोटीस कळझोंडीतील जमीनमालक, शेतकरी, ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्द करणे आवश्यक होते. मोजणीला आठ दिवस असताना नोटीस वितरण सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञच राहिले. प्रशासनाकडून या मोजणीविषयी संबंधित ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते, असा आक्षेप स्थानिकांनी घेतला होता. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता उपअधीक्षक भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी कळझोंडी येथे दाखल झाले.
अधिकारी मोजणीसाठी येणार असल्यामुळे ग्रामस्थ गोळा झाले होते. त्यांनी मोजणी प्रक्रियेला विरोध केला. याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘शासकीय प्रकल्पासाठी हे भूसंपादन सुरू आहे. त्याला काही स्थानिकांनी विरोध केला असला तरी पोलिस संरक्षणात सोमवारी पुन्हा मोजणी केली जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.