आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर झळकणाऱ्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे या तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा कायापालट करण्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करून त्याला पाच वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून प्राप्त ४० कोटींचा निधी गणपतीपुळे परिसर सुशोभीकरण, रस्ते व पाणीपुरवठा अशा कामांवर खर्च झालेला आहे. उर्वरित निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. गणपतीपुळे येथे दरदिवशी शेकडो पर्यटक भेट देतात. पर्यटन हंगामात हा आकडा लाखांवर जातो. या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी व तेथे असणाऱ्या सोयीसुविधांचा विचार केला तर त्यावर मर्यादा येतात. हे लक्षात घेऊन पर्यटन बृहत विकास आराखड्यांतर्गत गणपतीपुळे येथे पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे पर्यटन हंगामात येथील निवासस्थाने हॉटेल्स, उपहारगृहे देखील कमी पडतात. त्या वेळी सर्वत्र हाऊसफुल असे चित्र दिसून येते. यासाठी गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १०२.२८ कोटी रुपयांच्या आराखड्याला नियोजन विभाग शासननिर्णय २६ फेब्रुवारी २०१९ अन्वये मान्यता देण्यात आली होती.
त्यानुसार मंदिर परिसर स्वच्छ असावा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करावे, साफसफाई, मनुष्यबळ खासगी माध्यमातून घ्यावे, अशा अनेक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. गणपतीपुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत येथील विविध विकासकामांसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५९ कोटी ६० लाख ६१ हजार रुपये एवढा निधी २०२०-२१ साठी मंजूर करण्यात आला होता. यापैकी ११ कोटी ९३ लाख १२ हजार २०० रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून वितरित करण्यात येत असल्याचा अध्यादेश या वेळी काढण्यात आला. या निधीतून पर्यटनासाठी पायाभूत सविधा उपलब्ध करून देण्यावर भर देत ती कामे हाती घेण्यात आली. या आराखड्यात ५३ विविध बांधकामांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासन स्तरावर ४० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला व तो विविध कामांवर खर्चही झालेला आहे. पाणीपुरवठा योजनांची सुरू असलेली कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित कामांनाही लवकरच गती मिळून या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यासाठी नागरिकांकडून निधीची मागणी होत आहे.
आराखड्यातील समाविष्ट कामे – समुद्रकिनाऱ्यावरील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाय. सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी गटारांचे व्यवस्थापन. जलशुद्धीकरण केंद्र. तलाव सुशोभीकरणासह पोहण्याची ठिकाणे निश्चित.वॉटर स्पोर्टस् पार्किंग व्यवस्था. चार पर्यायी रस्त्यांचे दुपदरीकरण. डिंगणी ते जाकादेवी रस्ता १२ मीटर रूंदीकरण. चाफेफाटा-मालगुंड व्हाया निवेंडी-गणपतीपुळे रस्ता रुंदीकरण. जाकादेवी ते रामरोड, चिंचवणेमार्गे नेवरे गणपतीपुळे रस्ता रूंदीकरण