मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत आंबाघाटाचे रुंदीकरण सुरू आहे. या रूंदीकरणात निम्म्या घाटातील डोंगर कापून रूंदीकरण केले आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण, तर काही ठिकाणी डोंगर कापून वळणं काढली आहेत. रुंदीकरणाच्या या कामामुळे भविष्यात पावसाळ्यात आंबाघाटामध्ये दरड कोसळू नये किंवा भूस्खलन होऊ नये, यासाठी मजबूत सुरक्षाव्यवस्था केली जात आहे. डोंगराला छिद्रे पाडून त्यात खिळे ठोकण्यात येतात. त्यामध्ये रॉड टाकून लोखंडी जाळीने डोंगर सुरक्षित केला आहे. लोखंडी खांब उभारून त्याला जाड पत्रा मारण्यात येत असून, सुरक्षाभिंत उभारण्याचे काम सुरू आहे. घाटात सुरक्षिततेच्यादृष्टाने भक्कम उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून या घाटामध्ये भूस्खलन होणे, दगडी कोसळणे, रस्त्याचा भाग खचणे अशी नैसर्गिक आपत्ती अनेकवेळा ओढावली आहे.
त्यामुळे महिनाभर हा घाट बंद ठेवला होता. सर्व वाहतूक अणुस्कुरा घाटातून सुरू होती. महिनाभर खचलेल्या रस्त्याचा भाग दरीमधून संरक्षिक भिंत उभारत सुरक्षित करण्यात आला. त्यानंतर घाट सुरू झाला होता. यापूर्वी आंबाघाटात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. या सर्व घटना घडत असताना मिऱ्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये हा आंबाघाट आला आहे. या आंबाघाटातून बोगदा काढणार की, आंबाघाटाचे रूंदीकरण होणार, असा प्रश्न होता; परंतु बोगदा काढणे तेवढे संयुक्तिक नाही आणि ती बाब खर्चिक असल्याने सध्यातरी आंबाघाटाचे रुंदीकरण सुरू आहे.
मुशींपासून वर निम्मा आंबाघाटातील डोंगर कापून रुंदीकरण सुरू आहे. सेवा रस्ता सोडून अनेक ठिकाणी डोंगर कापून रुंदीकरण करण्यात येत आहे. काही ठिकाणी पूर्ण डोंगर कापून वळणं काढली आहेत. चौपदरीकरणातील एका पट्टीचे काँक्रिटचे दोन्ही मार्ग तयार झाले आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती आहे, अशा ठिकाणी संपूर्ण डोंगराला लोखंडी जाळी मारण्यात आली आहे. भूस्खलन रोखण्यासाठी दोन ठिकाणी रस्त्याच्या बाजूने लोखंडी खांब उभारून त्याला पत्रा मारला आहे. रूंदीकरणाबरोबर आगामी पावसाळ्यात कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी आंबाघाटाच्या सुरक्षेवरही जास्त भर दिला गेला आहे.