26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeDapoliदापोलीचे माजी आमदार संजय कदम स्वगृही परतले…

दापोलीचे माजी आमदार संजय कदम स्वगृही परतले…

संजय कदम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.

कोकणातील ठाकरे गटाचे उपनेते व माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला आहे. दापोलीचे माजी आमदार व ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी मुंबईत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम व जेष्ठ शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत मुंबई येथील बाळासाहेब भवनामध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजापूरचे माजी आ. राजन साळवी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, खेडचे तालुका प्रमुख सचिन धाडवे, खेडचे माजी सभापती अण्णा कदम, दापोलीचे माजी सभापती किशोर देसाई, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद काते यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ना. एकनाथ शिंदे यांनी संजय कदम यांच्या हातात भगवा ध्वज दिला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले.

शिवसेना मजबूत – गेले काही दिवस संजय कदम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मध्यंतरी संजय कदम यांनीही माध्यमांजवळ बोलताना शिवसेना प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले होते. या पक्षप्रवेशामुळे दापोली-मंडणगड-खेड विधानसभा मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे मानले जाते. एकेकाळचे रामदासभाई कदम यांचे उजवे हात मानले जाणारे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना सोडून गेल्याने संबंध दुरावले होते. मात्र पुन्हा एकदा रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली ते स्वगृही परतले आहेत. याचा मोठा फायदा दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे, असे मानले जाते.

चिंचघरचे सुपुत्र – खेड तालुक्यातील चिंचघर गावचे सुपुत्र असलेले संजय कदम यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही भूषवलं होतं. दरम्यान त्यावेळी त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू शकलं नाही. याच मुद्यावरून त्यांचे शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर त्यांचे बिनसले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यामुळेच त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते २०१४ साली सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवून दापोली मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतरच्या २०१९ आणि २०२४च्या दोन्ही निवडणुकांमध्ये संजय कदम यांनी योगेश कदम यांच्या विरोधात निवडणूक लढवली. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. यानंतर आता ते पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. मंगळवारी मुंबईत बाळासाहेब भवनमध्ये झालेल्या प्रवेशाच्यावेळी त्यांच्या समवेत पत्नी सौ. सायली कदम, डॉ. विक्रांत पाटील, किशोर साळवी, भरणे सरपंच संतोष गोवळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीदेखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

उपनेतेपदी नियुक्ती – माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांची उपनेतेपदी ना. एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीचे पत्र ना.शिंदे यांच्याहस्ते आणि जेष्ठ नेते रामदासभाई कदम, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत संजय कदम यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राध्यक्षपदी माजी सभापती किशोर देसाई यांचीं नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular