प्रतिवर्षी महाराष्ट्र राज्यात द्वितीय सत्र परीक्षा साधारणपणे १५ एप्रिल त्यापूर्वीच पूर्ण होत होत्या, त्यामुळे बच्चे कंपनी परीक्षा संपताच मामाच्या गावाला जाण्याचे नियोजन करत असत. पण यावर्षी राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षांसाठी राज्यभर एकच वेळापत्रक जाहीर केले आहे. सदर परीक्षा २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमधून नाराजीचा सूर दिसून येत असून यावर्षी विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाऊन मौजमजा करता येणार नाही. विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत शाळेत यावे लागणार आहे. दरवर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या.
पण, या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागल्यासारखीच स्थिती असायची. आता सर्वच शाळांची परीक्षा ५ ते २५ एप्रिल या दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. नववीच्या विद्यार्थ्यांची द्वितीय सत्र व पेंट परीक्षा एकाचवेळी घेण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार ५ ते २५ एप्रिलपर्यंत सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांचे पेपर घेतले जाणार आहेत. २०२४-२५ च्याशैक्षणिक वर्षाचा शेवटचा टप्पा सुरू सध्या असून अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात अंतिम तथा वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा लवकर घेण्याची मागणी – परीक्षा होताच फक्त एका आठवड्यातच उत्तरपत्रिका तपासून मूल्यमापन फॉर्म करणे, संकलित निकाल करणे, प्रगतीपुस्तके भरणे, वर्णनात्मक नोंदी घालणे यासारखे अनेक सोपस्कार पार पाडून १ मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर करण्याचे आव्हान शाळा शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर असणार आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार आहे. त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे. १ पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. त्याच राज्यभर एकाच वेळापत्रकाने परीक्षा हा शासनाचा निर्णय आहे आणि संपूर्ण राज्यभर अशाप्रकारे परीक्षा घेतली जाणार असल्याने हा बदल एका जिल्ह्यापुरता वेगळ्या वेळापत्रकाने घेता येणार नाही. शासन निर्णयानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.