सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या दोडामार्गच्या जंगलात पुन्हा एकदा पट्टेरी वाघ दिसून आला आहे. मालवणमधील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स या दोन ग्रुपचे दर्शन वेंगुर्लेकर, संजय परुळेकर, स्वप्नील, गोसावी आणि अक्षय रेवंडकर है निसर्गप्रेमी व प्राणीप्रेमी सदस्य नेहमी प्रमाणे दोडामार्गच्या जंगलात भटकंती करत असताना ४ एप्रिल रोजी रात्रीच्यावेळी त्यांना पट्टेरी वाघीण दिसून आली. झाडीझुडुपातून पाहत असलेल्या या वाघिणीचे दृश्य दर्शन वेंगुर्लेकर व सदस्यांनी आपल्या केले आहे. गेली सात वर्षे सिंधुदुर्गच्या जंगल भागात भटकंती करून प्राण्यांची माहिती गोळा करणाऱ्या या सदस्यांना प्रथमच वाघाचे दर्शन झाले. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून दोडामार्गच्या जंगलाचे वाघ इतर प्राण्यांच्या दृष्टीने असलेले महत्वही पुन्हा अधोरेखित झाले आहे.
मालवणमधील दर्शन वेंगुर्लेकर, संजय परुळेकर, स्वप्नील गोसावी आणि अक्षय रेवंडकर या प्राणीप्रेमी सदस्यांची आंबोली, दोडामार्गच्या परिसरात पंधरा दिवसातून एक फेरी असते. गेली आठ वर्षे जिल्ह्यात फिरून जिल्ह्यातील जंगल भागात आढळणारे विविध पक्षी, प्राणी व क्वचित दिसणारे वनचर यांचे छायाचित्रण करून त्यांची माहिती गोळा करण्याचे काम हे सदस्य करत असतात. यामध्ये रानमांजर, गवे, सांबर, मुंगुस, भेकर, खवल्या मांजर असे विविध प्राणी या सदस्यांच्या निदर्शनास आले आहेत. ४ एप्रिल रोजी हे सदस्य मालवणहून आपल्या गाडीतून दोडामार्ग च्या दिशेने निघाले. आजवर विविध प्राणी पाहिले, यावेळी वाघ दिसला पाहिजे अशी एक यावेळी दर्शन वेंगुर्लेकर यांनी सदस्यांशी बोलताना व्यक्त केली. दोडामार्गच्या जंगलात भटकंती करताना त्यांना म हाधनेश व मलबार ग्रे हे पक्षी दिसले. फिरता फिरता संध्याकाळ झाल्यावर भूक लागल्याने त्यांनी मित्राच्या घरी जाण्याचे ठरवले. मात्र मित्राचे घर बंद असल्याने त्यांनी कलिंगडावर ताव मारत आपली भटकंती सुरु ठेवली.
सूर्य अस्ताला जाऊन अंधार पडला. अंधारातून जाताना गाडीच्या हेडलाईट मुळे मिळणाऱ्या प्रकाशाचा आधार घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीझुडुपातही त्यांचे निरीक्षण सुरु होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला कोणाचे तरी डोळे चमकताना संजय परुळेकर यांना दिसले. मात्र भास असेल असे म्हणतं हे सदस्य पुढे निघून गेले. याच दरम्यान तेथून एक बस गेल्याने त्यातूनच त्यांचा मित्र घरी आला असेल या विचाराने त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. त्यानंतर थोडे अंतर जाताच त्यांना एक गाईच्या आकाराचा प्राणी रस्त्यावर चालताना दिसला. मात्र काळोख असल्याने ओळखू येत नव्हता. मात्र थोडे जवळ जाताच तो प्राणी म्हणजे पट्टेरी वाघ असल्याचे समजताच सर्व सदस्य सावध झाले. गाडी येत असल्याचे पाहून वाघ उडी मारून रस्त्याच्या कडेला जाऊन थांबला. गाडी पासून अवघ्या १० ते १५ फुटावर असलेला प्रत्यक्ष वाघ पाहून या सदस्यांची धडधड वाढली, सर्वांना च घाम फुटला.
दर्शन वेंगुर्ले कर यांनी तातडीने आपल्या कॅमेऱ्यातून या वाघाचे छायाचित्रण सुरु केले. सदस्यांनी केलेल्या निरीक्षणात ती वाघीण असल्याचे दिसून आले. काही काळ तेथे थांबून एकवार गाडीकडे बघून ही वाघीण जंगलात निघून गेली. गेल्या अनेक वर्षांपासून वाघ दिसावा म्हणून आतुरलेले चौघेही वाघाचे दर्शन झाल्याने आनंदाने फुलून गेले. वाघीण दिसल्याने जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाघाची संख्या वाढण्यासाठी त्यांचे अन्न सुरक्षित राहील याची काळजी आपण घ्यायला हवी. सांबर हरीण, डुक्कर, ससे यांची होणारी शिकार थांबवायला हवी. पाणवठे सुरक्षित करायला हवेत. जंगलातील गवत जाळायचे थांबवायला हवे, असे मत या प्राणीप्रेमी सदस्यांनी व्यक्त केले.