25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriहापूसच्या ८० हजार पेट्या एकाच दिवशी वाशीत

हापूसच्या ८० हजार पेट्या एकाच दिवशी वाशीत

हापूसचे दर साडेतीन ते ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

नवी मुंबई येथील बाजार समितीत हापूस आंब्यांच्या पेट्यांची बंपर आवक झाली आहे. सोमवारी (ता. ७) १ लाख हापूस आंब्यांच्या पेट्या दाखल झाल्या असून, त्यामध्ये ८० हजार पेट्या हापूस आंब्याच्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत तर उर्वरित २० हजार पेट्या परराज्यातील आंब्यांच्या आहेत. मंगळवारी (ता. ८) ६२ हजार ८०० पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे हापूसचे दर साडेतीन ते ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त केले जात असले तरी दर कमी झाल्याने बागायतदार नाराज झाले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात अपेक्षित मोहोर आला नाही. त्यामुळे यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात हापूसचे उत्पादन कमीच राहिले. परिणामी, बाजारातील हापूसचा दर पाच डझनच्या पेटीला ६ ते ८ हजार रुपये होता. गुढीपाडव्यालाही बाजारातील आवक कमीच होती. त्या वेळीही दर पेटीला ६ हजार रुपयांपर्यंतच राहिला. दर चढे असल्याने सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येत नव्हती. मागील पंधरा दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर उष्माही अधिक वाढला.

परिणामी, हापूस वेगाने तयार होऊ लागला आहे. त्यामुळे बाजारातील पेट्यांची संख्याही वाढलेली आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत प्रथमच ८० हजार पेटी हापूस कोकणातून वाशी बाजारात दाखल झाला आहे. त्यामध्ये रायगडमधून अत्यल्प असून, सर्वाधिक पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्गमधीलच आहेत. दर्जेदार फळाच्या पेटीला सर्वाधिक ४ हजार रुपये दर मिळत आहे तर डागी आंब्याला पेटीचा दर १ हजार रुपये आहे. एप्रिल महिन्यात हापूस अधिक चवदार होतो आणि गोडीही वाढत असल्याने ग्राहकांकडून मागणी सुरू होते. दरम्यान, यंदा वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलांनी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. या बदलांचा परिणाम आंबा उत्पादनावर होत आहे. यावर्षी राजापूर तालुक्यातून सर्वाधिक आंबा बाजारात दाखल होत असल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले.

थेट विक्रीतून चांगला दर – उन्हामुळे आंबा भाजायला लागला आहे. त्यामध्ये पावसाचीही भीती बागायतदारांपुढे आहे. त्यामुळे आंब्याची तोड वेगाने केली जात आहे. त्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढत आहे; परंतु नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आणि दर्जेदार हापूसला थेट ग्राहकांकडून डझनला एक हजार रुपये आणि पाच डझनच्या पेटीला ५ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे. सध्या बेंगलोर, गोवा, हैदराबाद, नागपूर येथे हापूसच्या पेट्या पाठवत असल्याचे बागायतदार जयवंत बिर्जे यांनी सांगितले.

रोज १२ हजार बॉक्स परदेशात – हापूसची आवक वाढत असली तरीही आखाती देश, युरोप, अमेरिका देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. रोज १२ हजार बॉक्स पाठवले जातात. त्याला दरही चांगला मिळत आहे. निर्यात व्यवस्थित सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular