मुंबई ते गोवा अशी १८० वर्षे जुनी जलमार्ग वाहतूक व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे. ही अति जलद रो-रो बोट सेवा थेट समुद्रमार्गे होणार असून मुंबई ते गोवा प्रवासाला केवळ ६ तास लागणार आहेत. या रो-रो सेवेमधून एकाच वेळी ६२० प्रवासी आणि ६० वाहने जाऊ शकणार आहेत. बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या माध्यमातून पूर्वी मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक सुरू करण्यात आली होती. मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ले या बंदरांवर थांबा घेत ती जहाजे पुढे गोव्याला जायची. १९६४ नंतर ही जलवाहतूक बंद झाली. आता १८० वर्षे जुन्या पद्धतीची ही जलवाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना समुद्रम ार्गे मुंबई ते गोवा असा प्रवास करायला मिळणार आहे. मुंबई ते गोवा हे अंतर ५८९ किमी इतके आहे. या प्रवासासाठी सध्या कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्ग असे वाहतुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई-गोवा महामार्ग प्रवासासाठी १० ते १२ तास लागतात. तर, रेल्वेने गेल्यास ८ ते ९ तासांचा अवधी लागतो. मात्र, आता समुद्रमार्गे हाच प्रवास केवळ ६ तासांत शक्य होणार आहे.
मार्च २०२५ पर्यंत ही रो-रो सेवा सुरू करण्याचे टार्गेट होते. मात्र, आता एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला ही वाहतूक सुरू होऊ शकते. या रो-रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक ही रो-रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. खासगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा अशी रो-रो बोट सेवा सुरू केली जाणार आहे. प्रवासी जहाजाच्या माध्यमातून प्रवाशांना मुंबई-गोवा प्रवास करता येणार आहे. गोव्याला जाणारे हे खासगी जहाज मुंबईतून निघेल. मुंबईतील माजगाव ते गोव्यातील मुरगाव दरम्यान अशी ही रो-रो फेरी असणार आहे. मुंबई-गोवा रो-रो ची ट्रायल रन झाली असून सुरुवातीच्या चाचणीत मुंबई-गोवा प्रवास ६.५ तासांत पूर्ण.. झाल्याचा दावा केला जात आहे. याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर माजगाव डॉक ते पणजी जेट्टी डॉकपर्यंत फेरी सेवा सुरू होईल. दरम्यान, या परवानगीसाठी गोवा सरकारशी चर्चा सुरू आहे.