रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून ओळखल्या जात असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाळ्यात सातत्याने दरडी आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने सर्वेक्षण करून अणुस्कुरा घाटरस्ता निर्धोक होण्यासाठी उपाययोजनांचा आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. सुमारे नऊ किमीचा असलेल्या तालुक्यातील अणुस्कुरा घाटमार्गाने कमी कालावधीमध्ये जा-ये करणे शक्य होते. त्यामुळे या घाटातून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. नागमोड्या वळणांच्या या रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी उंच डोंगर, उभ्या रेषेतील दरडी, मोठमोठ्या दगडी ठिकठिकाणी कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या काळामध्ये धोकादायक दरडी, मोठमोठे दगड आणि माती पडून रस्ता काही काळापुरता बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यामध्ये सातत्याने दरडी कोसळण्याच्या घडणाऱ्या घटना आणि गतवर्षी सलग दोन आठवडा भूस्खलनामुळे घाटरस्ता बंद राहण्याचा घडलेला प्रकार याची प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी आज नैसर्गिक आपत्ती आराखडा आढावा बैठकीमध्ये दखल घेतली. पावसाळ्यातील अतिवृष्टीमध्ये भूस्खलन वा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तरी त्यावर तत्काळ उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आणि यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन यांनी प्रशासनाला दिल्या. धोकादायक दरडी, अरूंद अन् धोकादायक वळणे, संभाव्य भूस्खलन, संरक्षण कठड्यांची आवश्यकता आदींच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करून निर्धोक अणुस्कुरा घाटरस्ता तयार करण्यासाठी उपाय योजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या.