24.4 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeSportsमुंबईला सलग सहाव्या विजयाची आशा, राजस्थान रॉयल्सशी आज लढत

मुंबईला सलग सहाव्या विजयाची आशा, राजस्थान रॉयल्सशी आज लढत

बुमराच्या प्रवेशानंतर मुंबईच्या संघाचाही कायापालट झाला.

गुजरात टायटन्स संघावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ उद्या (ता. १ मे) घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा सामना करणार आहे. मुंबईच्या संघाने सलग पाच सामन्यांत विजय मिळवताना शानदार कामगिरी केली आहे. आता मुंबईच्या संघाला सलग सहाव्या विजयाची आशा आहे. जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी कशाप्रकारे फलंदाजी करतो, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. मुंबईच्या संघाला पहिल्या पाच लढतींमध्ये फक्त एकाच लढतीत विजय मिळवता आला होता. त्यानंतर सलग पाच सामन्यांमध्ये विजय संपादन करताना मुंबईच्या खेळाडूंनी कात टाकली आहे. याचदरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचेही मुंबई संघात पुनरागमन झाले होते. बुमराच्या प्रवेशानंतर मुंबईच्या संघाचाही कायापालट झाला. मुंबईच्या संघातील फलंदाज शानदार खेळ करीत आहेत.

रायन रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स यांच्या बॅटमधून धावा निघत आहेत. या सर्व फलंदाजांमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. जसप्रीत बुमराच्या पुनरागमनानंतर मुंबईचा गोलंदाजी विभागही प्रभावी कामगिरी करीत आहे. स्वतः बुमरा याने दुखापतीवर मात करीत मैदानावर झोकात पुनरागमन केले आहे. त्याच्यासह ट्रेंट बोल्ट, दीपक चहर या वेगवान गोलंदाजांकडून चमक दाखवली जात आहे. विल जॅक्स, कर्ण शर्मा व हार्दिक पंड्या यांच्याकडूनही गोलंदाजीत ठसा उमटवला जात आहे.

उत्सुकता शिगेला – जसप्रीत बुमरा हा जगातील अव्वल गोलंदाजांपैकी एक. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा जगातील सर्वात लहान युवा फलंदाज. आता या दोन खेळाडूंमधील द्वंद्व उद्याच्या लढतीत पाहायला मिळणार आहे. वैभव हा यशस्वी जयस्वाल याच्यासोबत सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे साहजिकच त्याच्यासमोर बुमरासह ट्रेंट बोल्ट याचेही आव्हान असणार आहे. वैभव या दोन गोलंदाजांसमोर कशाप्रकारे फलंदाजी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अंधुक आशा – राजस्थानच्या संघाने आतापर्यंत दहा सामन्यांमधून फक्त तीनच लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. त्यांना आता चार लढती खेळावयाच्या आहेत. या चारही लढतींमध्ये विजय मिळवल्यानंतरही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची अंधुक आशा असणार आहे. या अंधुक आशेसाठी राजस्थानला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. राजस्थानच्या संघासाठी संजू सॅमसनची दुखापत चिंतेचा विषय ठरत आहे. तो या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. तसेच त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. त्याच्या अनुपस्थितीत राजस्थानचा खेळ खालावला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular