गेले आठ दिवस पावसाने किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले होते. आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे किनारपट्टीवरील लोकांनी निःश्वास सोडला होता. दुपारी ४ नंतर पावसाने संथ सुरुवात केली. ५ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे सुटले आणि २० मिनिटे जणू वादळच झाले. त्यातच जोरदार पाऊस सुरू झाला. वादळामुळे घरांची छपरे उडाली, एवढा वाऱ्याचा वेग होता. त्यामुळे किनारपट्टीलगतच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. किनारपट्टीलगत अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील आडे पाडले येथील किमान २० घरांची छपरे उडून गेली. कुणाचे पत्रे उडाले, तर कुणाची कौले उडून गेली. रस्त्यावर झाडे कोसळून वाहतुकीस मार्ग बंद झाला.
हर्णैमध्ये देखील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी चौकात झाडाची मोठी फांदी कोसळली. त्यामध्ये तीन दुचाकी झाडाखाली असल्याने त्यांचेही नुकसान झाले. येथील स्थानिक ग्रामस्थांनी ते झाड बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला. हर्णैमधील महसूल कर्मचारी अक्षय पाटील व प्रणिता वेदपाठक यांनी पाहणी केली व उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. बहुतांशी किनारपट्टीलगतच्या गावांना या किमान २० ते २५ मिनिटे आलेल्या वादळामुळे मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. तो सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.
यांच्या घरांची वादळात हानी – आडे येथील तलाठी राहुल जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाडले येथील जितेंद्र मोहन मयेकर, बलराम रामचंद्र लिमये, प्रसन्नकुमार श्रीपाद लिमये, स्वदेश संदीप लिमये, शशिकांत मुकुंद लिमये, प्रसाद उदय लिमये, कौस्तुभ अरुण लिमये, दत्तात्रय पांडुरंग हुमणे, अमित प्रभाकर दांडेकर, अंकेश अनिल जोशी, तर आडवे येथील अजित बेहेरे यांच्या घरांचे नुकसान झालेले आहे.