मुंबई – गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गुटखा वाहतूक करणारी गाडी येथील पोलिसांनी पकडली. या कारवाईत तब्बल १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा तर ७ लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी असा २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देम ाल पकडला आहे. या कारवाईने बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरातील टपरींवर सर्रास गुंटखा विकला जात असल्याची सातत्याने ओरड होत आहे. मात्र, अन्न औषध प्रशासन त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची चिपळूणवासीयांमधून जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुटख्याची गाडी चिपळुनात येत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार वृषाल शेटकर, पोलीस हवालदार संदीप मानके, पोलीस नाईक रोशन पवार, समिधा पांचाळ, किरण केदार या पथकाने कापसाळ येथे सापळा रचत संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी तपासणीसाठी थांबवली.
यावेळी या गाडीची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी ही गाडी पोलीस ठाण्यात आणली. पंचनाम्याअंती या गाडीत सुमारे १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला आहे. तर बोलेरो पिकअप गाडी ७ लाख रुपयांची असा एकूण २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सज्जन रामचंद्र नेवगी (वय ३५, रा. इंसुली, सावंतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. गुटखा वाहतूक करणाऱ्या चालकास येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर हा गुटखा कोणत्या व्यावसायिकाला देणार होता?. याचा तपास लावण्याची मागणी केली जात आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.