27.3 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeChiplunपरशुराम घाटात गॅबियन वॉल खचली - दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

परशुराम घाटात गॅबियन वॉल खचली – दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीचा दरडीचा भाग आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र गॅबियन वॉल खचली आहे. यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मागील दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेचा विषय ठरलेला आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीचा दरडीचा भाग आहे. तिथे पावसाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे मागील पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्यात येत आहे. त्यातील ६० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र मे महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे महामार्गावरील परशुराम घाटातील सुरक्षिततेची कामे थांबली.

आता पुन्हा त्या कामांनी वेग घेतला आहे; परंतु दरड घसरू नये यासाठी बांधलेली गॅबियन वॉल घसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काँक्रिटचा रस्त्याला धोका पोचू शकतो. पुढील महिन्यात पावसाचा जोर वाढेल, त्या कालावधीत गॅबियन वॉल आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर महामार्गावरील वाहतुकीला फटका बसू शकतो. सध्या सुरू असलेल्या कामाला मोसमी पावसाचा तडाखा बसला असला तरीही परशुराम घाटात सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर शंका निर्माण झाली आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्य रस्त्यापासून १५ फुटांवर संरक्षक भिंत उभारली जात आहे. ही भिंत काँक्रिटीकरणाच्या सुरक्षेसाठी आहे. सध्यातरी मुख्य रस्त्याला कोणताही धोका नाही, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular