कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि एस.टी. महामंडळाने उत्कृष्ट नियोजन केले होते. एसटी मंडळाने मुंबई विभागातून गणपतीसाठी कोकणात जाण्या-येण्यासाठी एकूण ४४०० जादा बसचे नियोजन केले असून, जाण्याचा हंगाम संपताच आता मंगळवार गौरी-गणपती विसर्जनापासून परतीच्या हंगामासाठी सुद्धा एसटी आणि रेल्वे सज्ज झाल्या आहेत.
चाकरमान्यांच्या परतीसाठी सुद्धा एसटीने २२०० जादा बस तयार ठेवल्या असून, रविवार पर्यंत १५०० बसचे ग्रुप आणि नॉर्मल बुकिंग फुल झाले असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. आता मंगळवारपासून दोन आणि पाच दिवसांचा गणपती उत्सव साजरा करून चाकरमानी पुन्हा आपल्या मुंबई पुण्याच्या घरी परततील. प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी ला प्रथम पसंती दिल्याने आरक्षण मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामध्ये प्रवाशांच्या वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी, महामंडळाने विशेष नियोजन केले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी देखील अहोरात्र मेहनत घेत आहेत.
कोकणात आलेल्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने देखील या मार्गावर दहा स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ते २० सप्टेंबर दरम्यान या मार्गावर या जादा गाड्या सोडल्या जाणार असून कोकण रेल्वेने घेतलेला हा निर्णय म्हणजे चाकरमान्यांना बाप्पा पावल्यासारखाच आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावर फिरती गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी विशेष गस्ती पथकांची नेमणूक केलेली आहे. याशिवाय कोकणातील महामार्गावर वाहने नादुरुस्त झाली तर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ठिकठिकाणी वाहने दुरूस्ती करणारी पथके देखील तैनात करण्यात येणार आहेत. एसटी महामंडळ प्रशासनाने प्रवासा दरम्यान प्रवाशांना काही अडचण उद्भवल्यास १८००२२१२५० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.