महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले असून, आता गौरीच्या आगमनाने आनंद द्विगुणीत झाला आहे. सोन पावलांनी रविवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले आहे. रविवार सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, तरीही अनेक सुवासिनी गौरीच्या पूजनासाठी माहेरी दाखल झाल्या आणि गौरीचे उत्साहात विधिवत पूजन करून गणपतीच्या शेजारी स्थानापन्न करताना मुली आणि महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
काही ठिकाणी गौरी हि खड्यांची असते, तर काही ठिकाणी मुखवट्याची असते, तर काही ठिकाणी पूर्णाकृती नवीन साडी, दागदागीन्यांनी नटलेली गौरी पहायला मिळते. सोशल मिडीयाचा एक सुयोग्य वापर म्हणजे विविध प्रकारच्या गौरींचे पूजन पहायला मिळते. प्रत्येकाच्या रिती, परंपरा, पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची सुद्धा प्रथा असून आज ही गणपती आणि गौरीच्या मधी पडदा लावून गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखविण्याची प्रथा पाळली जाते.
कोकणातील मोठा सण असलेला गणेशोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे सुमारे पाचशे वर्षांपासून ‘एक गाव- एक गणपती’ हि प्रथा आहे. या गावामध्ये कोणाच्याही घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. गणपतीचे स्वयंभू स्थान गावातच असल्याने गणपतीपुळे मंदिरातील गणपती हाच आपल्या घरातील गणपती समजून पूजाअर्चा केली जाते. परंतु गौराईचे आगमन मात्र घरोघरी धुमधडाक्यात केले जाते.
रविवारी गणपतीपुळे येथे उत्साहाने आणि भक्तिभावाने पाणवठ्यावरून गौराईचे आणल्या जातात. येथील प्रत्येक घरातील महिला, मुली पूजा साहित्य घेऊन गणपतीपुळेच्या खाडीकिनारी जातात आणि त्या ठिकाणी वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात गौराई आपल्या घरी घेऊन येतात. मग झिम्मा, फुगड्या, गाणी यांनी रात्र जागविली जाते.