मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी नुकतीच केली. जलवाहतुकीचा चांगला पर्याय यानिमित्ताने निर्माण होणार आहे. या प्रकल्पाने चांगला वेग घेतला असून, ज्या एजन्सीचे जहाज निश्चित केले आहे त्या जहाजाच्या कॅप्टन व अन्य टीमने भगवती व जयगड बंदराची पाहणी केली. पावसामध्ये एवढ्या जलदगतीने त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, सुरक्षा, प्रवासीसुरक्षा, वाहन उतरवण्यासाठी स्थिर जेटी उपलब्ध होणे आव्हानात्मक असल्याने या रो रो सेवेला अडथळ्यांशी सामना करावा लागणार आहे. प्रादेशिक बंदर विभागाच्या पाहणीमध्ये या अडचणी पुढे आल्या आहेत. रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. दळणवळण व्यवस्था भक्कम करतानाच रस्ते आणि रेल्वे सोबतच जलवाहतूक वाढावी यासाठी फडणवीस सरकार प्राधान्य देत आहे.
त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार आहे. तिथून थेट रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत तब्बल साडेचार ते पावणेपाच तासात पोहोचता येणार आहे. या जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणार आहोत. यासाठी लागणारी मोठी बोट किंवा क्रूझ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस त्याची पाहणी करतील आणि लवकरच गणेश चतुर्थीच्यापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न असेल, असे मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले. गणेशचतुर्थी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाने गती घेतली आहे. जे क्रूझ निश्चित करण्यात आले आहे त्या क्रूझच्या कॅप्टन व अन्य टीमने भगवती आणि जयगड बंदराची पाहणी केली.
पाहणीत सर्व गोष्टींचा विचार – क्रूझच्या कॅप्टन व अन्य सहकाऱ्यांनी दोन्ही बंदरामध्ये प्रवासी आणि वाहने उतरण्यासाठी योग्य जेटी आहे का ? येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काय करता येईल ? त्यांना उतरणे आणि चढवण्याच्यादृष्टीने काय व्यवस्था आहे, आदी बाबींचा विचार या पाहणीत केला आहे.