शहरातील मांडवी समुद्रकिनारा प्रचंड प्रमाणावर आलेल्या प्लास्टिक कचरा आणि अन्य विविध प्रकारच्या कचऱ्याने व्यापला आहे. या किनाऱ्याच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून, पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक रहिवाशांनाही याचा त्रास होत आहे. पालिकेकडून तात्पुरती स्वच्छता केली जाते; परंतु कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वीच्या काळात गेट वे ऑफ रत्नागिरी असे संबोधले जाणारे मांडवी आहे. येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मांडवी किनाऱ्यावर चार मोठी हॉटेल्स आहेत. भेळ, पाणीपुरी, कणीस, शहाळी विक्री करणारी सुमारे २० विक्रेते आहेत. तसेच, लहान मुलांसाठी पाळणे, घोडा गाडी आदी खेळाचे प्रकार असलेले व्यावसायिक आहेत. मांडवीच्या पर्यटन विकासासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. मांडवी जेटीची सुधारणा करण्यात आली, संरक्षक बंधारा बांधण्यात आला; परंतु किनारा स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.
यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मांडवी किनारा स्वच्छतेची जबाबदारी रत्नागिरी शहरातील एका नामवंत कंपनीकडे दिली होती. त्यांनी सीएसआर फंडातून खर्च करावा, असे सांगण्यात आले होते तसेच याचा फलकसुद्धा मांडवीत लावण्यात आला होता. काही वर्षे नियमित सफाईसुद्धा होत होती; परंतु संरक्षक बंधाऱ्याच्या कामावेळी हा फलक काढून टाकला. त्यानंतर जिल्हाधिकारी बदलले आणि कंपनीचे व्यवस्थापनही बदलले. त्यामुळे आता स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यटक, स्थानिक रत्नागिरीकरांना फिरणेसुद्धा कठीण झाले. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे कचरा साचल्यानंतर स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी व नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छता केली होती; परंतु त्यानंतरही पालिकेकडून स्वच्छता होत नसल्यामुळे पर्यटन व्यवसायावरसुद्धा परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.
सर्वच किनाऱ्यांवर कचरा – सर्वच किनाऱ्यांवर कचरा येत असतो; परंतु त्याची स्वच्छता दररोज होणे आवश्यक आहे. भाट्ये किनाऱ्यावर मशीनद्वारे स्वच्छता केली जाते; परंतु मांडवीसारख्या ठिकाणी मशीन येऊनही स्वच्छता झालेली नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून हे मशीन चालवले पाहिजे; परंतु प्रशिक्षित चालक नसल्याने हे मशीन पालिकेतच पडून असल्याचे बोलले जात आहे.
ये रे माझ्या मागल्या – मांडवी किनाऱ्याची नियमित स्वच्छता होण्याची आवश्यकता आहे; परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पर्यटन विकासावर भर दिला जात असताना किनारा स्वच्छतेकडे का दुर्लक्ष केले जाते, याचे कोडे अद्याप उलगडले नाहीये. तसेच वृत्तपत्रांमध्ये बातमी आल्यानंतर दखल घेतली जाते. त्यानंतर थोडे दिवस स्वच्छता होते नंतर ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती असते, असे येथील नागरिकांनी सांगितले.