कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांचं वेगळं नातं आहे. ते गावागावांतून कधीच तुटू शकत नाही. गावातील नागरिकांना धनुष्यबाण माहिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माहीत आहेत. त्यामुळे लोक स्वतःहून शिवसेनेत येत आहेत. तेव्हा जनतेची कामे झाली पाहिजेत या दृष्टीने कामे करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागा, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले. चिपळूण दौऱ्यावेळी शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, परिमल भोसले, दिलीप चव्हाण, निहार कोवळे, विनोद पिल्ले, महम्मद फकीर, करामत मिठागरी, सुयोग चव्हाण, विकी लवेकर, संदेश गोरिवले आदी उपस्थित होते. आमदार राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर आल्यानंतर सकपाळ यांच्या कार्यालयास भेट दिली. यानंतर राणे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने कामाला लागा. पक्ष मजबूत करा.
आपण कडवट शिवसैनिक पदाधिकारी आहात. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुमचा भाऊ आहे. तुमच्या कुटुंबातील आहे. मी तुम्हाला आपल्या कुटुंबातील समजतो. मी तुमच्या पाठीशी १०० टक्के सदैव उभा असणार आहे. गेली दहा वर्षे आपल्या कपाळाला गुलाल लागला नव्हता. ते तुमच्यामुळे शिवसेना पक्षामुळे लागला असे आपण आभार दौऱ्यात एकनाथ शिंदे यांना सांगितले. यामुळे शिवसेना पक्षाचे उपकार आयुष्यात कधीच विसरणार नाही. चिपळूणमुळे आपल्याला ओळख मिळाली. ही ओळख गेली दहा वर्षे टिकवण्यामध्ये चिपळूणने मोठे सहकार्य केले. आपलं कोणाशी मनापासून वैर नव्हते. आपणही कुणी ठेवू नका. विचारात मतभेद होऊ शकतात; परंतु संबंधामुळे कधीही वैर येता कामा नये. ते आजपर्यंत आम्ही पाळले आहे.
शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करा… – कोकण आणि शिवसेनेचे नातं वेगळं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी शिवसेना गावागावात पोहोचवायची आहे. शिवसेनावाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी यावेळी केले.