येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकृत ई-मेल आयडीचा वापर करून सायबर फसवणुकीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून १२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये काढल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनोळखी विरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ते ५ जून या कालावधीत घडली आहे. याबाबत विद्यापीठातील अधिकारी धनश्री दीपक सामंत यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. २ ते ५ जून दरम्यान, विद्यापीठाचा ई-मेल आयडी (ac1dbskkv@ rediffmail.com) हॅक करून त्याचा गैरवापर करण्यात आला. या ई-मेल आयडीवरून बँकेच्या ई-मेल आयडीमध्ये बदल करून मेलवरील एक्सल शीटमध्ये बदल करून त्यात दुसरे खाते नंबर टाकून बनावट एक्सल शीट एसबीआय बँकेच्या दापोली शाखेच्या मेल आयडीवर (sbi.01047@sbi.co.in) पाठवली.
त्यानंतर मेल डिलीट करून बदल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या बनावट एक्सल शीटद्वारे १२ खात्यांवरून विद्यापीठाच्या १२ निवृत्त कर्मचाऱ्यांचे एकूण ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. हे समजल्यावर विद्यापीठातील अधिकारी धनश्री दीपक सामंत (भागवत हॉस्पिटल, आनंदवन, जालगाव, ता. दापोली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. अनोळखीने फसवणुकीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रयत्नांमुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सायबर पोलिस करत आहेत.