पहिल्या पावसात आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्ग उखडून रस्त्याला भेगा आणि तडे गेल्याने निसर्गाने या राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट आणि बेजबाबदार कामाचे पितळच उघडे पाडले आहे. याचबरोबर यंदाचे हंगामात काम पूर्ण करण्याचे प्राधिकरण व ठेकेदाराने महसूल प्रशासनास दिलेले आश्वासन हे शेवटी दिवास्वप्नच ठरले आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे शेनाळे, तुळशी, पाचरळ घाटासह विविध ठिकाणी नवीन काँक्रिट रस्ता खचला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. महामार्गावर म्हाप्रळ ते आंबवणेदरम्यान सुरू असलेली लहान मोऱ्या व पुलांची सर्व कामे अर्धवट राहिल्याने पर्यायी मार्गावरील वाहतूक अडचणीत आली आहे. धोकादायक वळणे यांच्यासह जोडरस्ते, महामार्गाशेजारील अर्धवट रस्ते यामुळे समस्यात भर पडली आहे. वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गाच्या कामाचे अनेक किस्से रोज समोर येत आहेत. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे रोजचे होणारे अपघात, रस्त्याच्या कामाची अवस्था, प्रवासी आणि ग्रामस्थांचे होणारे हाल याबाबत समाजमाध्यमे व मीडिया सातत्याने वस्तुस्थिती समोर आणत असताना देखील प्रशासन व ठेकेदार कंपनी गांभीर्यपूर्वक घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाशांचे बळी घेण्याची प्रतीक्षा तर सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गाचे काम निकृष्ट होत आहे, हे सांगण्यासाठी कोण्या मोठ्या तज्ज्ञांची आता गरज नाही. महामार्गाच्या नवीन; पण निकृष्ट कामाचे निसगनिच पितळ उघडे पाडले आहे. रस्ता वाहतुकीस धोकादायक असूनही येथून वाहन वर्दळ सुरू आहे. अगदी ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूकही सुरू आहे.
अडचणीची माहिती ठेकेदार कंपनीला असताना धोकादायक असलेल्या ठिकाणी बॅरिकेटर्स लावून वा सूचनाफलक लावणे गरजेचे असताना सुद्धा कंपनीकडून ते करण्याची साधी तसदीसुद्धा घेण्यात आली नसल्याने छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची ये-जा सुरू असून, संभाव्य असलेला धोका सत्यात उतरला तर न भरून येणारी हानी होऊ शकेल व त्या वेळी वेळ निघून गेलेली असेल एवढे खरे; मात्र प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदार कंपनीला कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही.