27.5 C
Ratnagiri
Wednesday, July 30, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriडोंगर सरळ रेषेत कापल्याने वाढला धोका - चौपदरीकरणातील त्रुटी

डोंगर सरळ रेषेत कापल्याने वाढला धोका – चौपदरीकरणातील त्रुटी

महामार्गावर तीन ठिकाणी पावसात धोका दरड कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर ते लांजा टप्प्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी डोंगर खोदण्यात आले आहे. हे करताना पर्यावरणीय परिणाम लक्षात न घेतल्यामुळे पहिल्याच पावसात महामार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. या परिसरात राहणारे नागरिकही जीव मुठीत धरून राहत आहेत. या परिसरातील डोंगर ३० ते ४० फूट उंचीने सरळ रेषेत कापले गेले आहेत. टप्प्याटप्प्याच्या पायऱ्या करण्यासाठी अधिकचे भूसंपादन करावे लागणार असल्यामुळे हा प्रताप केल्याची माहिती पुढे आली आहे. कसबा, कोळंबे, कांटे येथे दरड कोसळण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या पाहणीतून पुढे आले आहे. महामार्गावरील आरवली ते काटे या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या पावसापूर्वी बरेचसे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती; परंतु त्यात यश आले नाही. काही भागातील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यंदा १५ मे पासून पाऊस सुरू झाल्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठीही वेळ मिळालेला नव्हता; मात्र डोंगराळ भागात महामार्गासाठी आवश्यक खोदाई करताना डोंगराच्या बाजूने सुरक्षेवर भर देणे आवश्यक होते; परंतु ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. खोदाई केलेल्या भागातील मातीतून पावसाचे पाणी वेगाने वाहत असल्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार यंदा वाढलेले आहेत. त्याला अटकाव करणे अशक्य झाले आहे. त्या ठिकाणी संरक्षक भिंत अपेक्षित होती. दरड कोसळल्यानंतर काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे; मात्र त्या भिंतींची उंची आणि मजबुती यावर लक्ष दिलेले नाही. अर्धवट भिंतींमुळे त्यावर दरड कोसळून माती रस्त्यावर येत आहे. शास्त्रीपुलाजवळ दरड कोसळल्याने तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यांना स्थलांतर करावे लागले आहे.

अशीच परिस्थिती कसबा, कोळंबे, कांटे येथेही उद्भवलेली आहे. लांजा येथे दोन दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीयनि पाहणे आवश्यक आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे. काटकोनात खोदलेले डोंगर कोणत्या वैज्ञानिक आधारावर स्थिर राहतील याचे नियोजन आणि मूल्यांकन होणे गरजेचे आहे. पावसामुळे नवीन काँक्रिट रस्ता काही ठिकाणी खचला असून, मोठ्या भेगाही गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाचे पाणी वाहत असून, तिथे रस्त्याला भगदाड पडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

संरक्षक भिंतीसह सतर्कतेचे फलक – महामार्गावर तीन ठिकाणी पावसात धोका दरड कोसळण्याची शक्यता आहे. तिथे दरडप्रवण असा फलक लावून प्रवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शास्त्रीपूल येथे दरड रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. डोंगर उभे कापल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या शास्त्री नदी पुलाजवळ दरड कोसळल्यानंतर तेथील ३ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केले असून, कायम उपाययोजना म्हणून तेथील जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला आहे. तसेच सध्या राहत असलेल्या ठिकाणचे भाडेही शासनाकडून मिळवून दिले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. पी. कुलकर्णी यांनी दिली.

डोंगराळ भागात नैसर्गिक उतार ठेवा – महामार्गावर सध्या कोसळत असलेल्या दरडीला तीन कारणे आहेत. कोकणातील नैसर्गिक उतार साधारण १५ ते ३५ अंशात असतात; मात्र महामार्गावर खोदाई करताना ते ७५ अंशापर्यंत गेले आहेत. डोंगराळ भागातून वाहणाऱ्या नैसर्गिक प्रवाहांना धक्का बसला असून, पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी त्या त्या परिसरातील दोन-चार ओढे एकत्र करून त्यांना मार्ग काढून दिला जात आहे. परिणामी, पाण्याचा प्रवाह वाढून त्याबरोबर माती खाली येत आहे तसेच अनेकवेळा फक्त ओढ्याच्या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा अभ्यास केला जातो; परंतु पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याचा विचार केला जात नाही. ते पाणी उताराच्यावरील बाजूला जमा होते. यावर उपाययोजना करण्यासाठी पाण्याचे प्रवाह विभागून सोडणे गरजेचे आहे तसेच डोंगराळ भागात नैसर्गिक उतार ठेवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया भूगर्भ अभ्यासक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular