जयगड नांदिवडे येथील एलपीजी गॅस टर्मिनलचे काम तत्काळ थांबवावे, असे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाकडून जिंदल कंपनीला दिले होते. आदेश धाब्यावर बसवून कंपनीकडून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. याची गंभीर दखल सागरी महामंडळाने घेऊन कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी एकमुखी मागणी नांदिवडे ग्रामस्थांकडून काल सायंकाळी जयगड येथे झालेल्या बैठकीत केली. यावेळी बांधकाम ठिकाणचे साहित्य हटवण्यास कंपनीने आश्वासन दिले. जिंदल गॅस टर्मिनलबाबत सागरी महामंडळ, जिंदल कंपनी अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात ही बैठक काल सायंकाळी झाली. बैठकीला प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप मुजबळ, बंदर अधीक्षक शेखर वेंगुर्लेकर, बंदर निरीक्षक शंकर महानराव, जेएसडब्लूचे अधिकारी सचिन गबाळे, सुदेश मोरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील, प्रहार दिव्यांग संस्था ठाणे जिल्हाध्यक्ष काजल नाईक, नांदिवडे माजी सरपंच गुरुनाथ सुर्वे, जयगड माजी सरपंच अनिरूद्ध साळवी उपस्थित होते.
बैठकीत ग्रामस्थांच्या वतीने अॅड. पाटील यांनी ग्रामस्थांची बाजू मांडली. ग्रामस्थांनी गॅस टर्मिनल प्रकल्प अन्यत्र हलविण्याची पुन्हा मागणी केली. प्रकल्पासाठी केवळ नाहरकत दाखला कंपनीला दिला होता. बांधकाम परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे परवानगी न घेता सुरू असलेले प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश सागरी मंडळाकडून देण्यात आले. तरीसुद्धा कंपनीकडून बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम कुणाच्या परवानगीने केले, अशी विचारणाही करण्यात आली. यावेळी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. १२ डिसेंबर २०२४ ला जिंदल गॅस टर्मिनलमधून वायूगळती झाल्याने नजीकच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. याप्रकरणी कंपनीच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकल्प अन्यत्र हलवावा अथवा बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. स्थानिक ग्रामस्थ आजही या मागणीवर ठाम आहेत. कंपनीवर गुन्हा दाखल करावा; अन्याथा कंपनीचा मनमानी कारभार थांबणार नाही, असेही स्पष्ट केले.