ऑनलाईन ट्रेडिंगमधील गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत रत्नागिरीतील एका तरुणाची ५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माज एजाज सुभेदार (वय २८, आंबेडकर रोड, धनजीनाका, रत्नागिरी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या संशयिताने पहिल्यावेळी गुंतवणूक केलेल्या रकमेतून संबंधित तरुणाला फायदा मिळवून देत विश्वास संपादन केला होता. जी. श्री. किशना नावाने प्रोफाईल असलेली व्यक्ती (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना १४ ते १७ जून या कालावधीत टेलिग्राम अॅपवरून घडली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माज सुभेदार यांना टेलिग्राम अॅपवरून संशयित किशना हा संपर्कात आला. त्याने ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, जास्त नफा मिळवून असे सांगितले.
त्याप्रमाणे माज देतो, याने सुरुवातीला गुंतवणूक केली. त्यामधून माज याला फायदाही मिळाला. त्यामुळे माज यांचा विश्वास बसला. त्यानंतर संशयिताने दिलेल्या यूपीआयडी व बँक खात्यावर सुभेदार यांनी १ लाख ७५ हजार आणि सुभेदार यांचा मित्र अजमल साजीद सोलकर यांच्याकडील ३ लाख ५८ हजार, असे मिळून ५ लाख ३३ हजार रुपये जमा केले. काही दिवसांनी ट्रेडिंगमध्ये गुंतवलेली रक्कम त्या संशयिताकडे परत मागितली; परंतु त्याने ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे सुभेदार यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित जी. श्री. किशना या प्रोफाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.