शरद पवार यांना सोडून शिवसेनेत आलो ही सर्वात मोठी चूक होती, आता त्याचे परिणाम भोगावे लागत असतील, अशी कबुली शिवसेना उद्धव बाळासाहेब. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देताना अनेक गौप्यस्फोट केले आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडात तेव्हा आपणही सहभागी होणार होतो, या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. त्याचं बरोबर आता सत्तरी जवळ आली, असे सांगत राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच विद्यमान सरकारमध्ये विरोधीपक्ष नेते पद न मिळाल्याची खंतही त्यांनी मांडली. राज्यात महाविकास आघाडीचे २०१९ मध्ये सरकार आल्यावर भास्कर जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. पवारांची साथ सोडल्यामुळे पवारांनी भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळू दिले नाही का? आजवरचा इतिहास आहे की पवारांना जे सोडून गेले त्यांना भविष्यात कोणतही पद मिळालं नाही. या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार हा मोठ्या मनाचा माणूस आहे.
त्यांनी माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल. असे मला वाटत नाही. पण त्यांनी जर केले असेल तर ते बरोबर केलं आहे. पवार साहेबांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी कबुली जाधव यांनी दिली. भास्कर जाधव पुढे म्हणाले, हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो पवार साहेबांना नक्की हे केलं नसेल. कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदेच्या बंडावेळी भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. भास्कर जाधवही बंडात सामील होणार होते, अशी चर्चा होती. यावर उत्तर देताना भास्कर जाधव यांनी २१ जूनचा किस्सा सांगितला.
जाधव म्हणाले, आठवण करा, मी जर नाराज असतो, तर अर्णब गोस्वामी प्रकरणात सरकारची बाजू मी परखडपणे मांडली नसती. मी शिंदेंसोबत कधीही गेलो नाही, आणि मला जर शिंदे सोबत जायचं असतं तर मी उघडपणे गेलो असतो, लपून छपून गेलो नसतो. मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं कारणही नसतं. गुहागरमध्ये पक्षाची मिटींग झाल्यावर उद्धव ठाकरेंचा मला फोन आल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितले. ठाकरेंनी मला त्वरीत मुंबईला निघून येण्यास सांगितले. त्वरित परतीची रेल्वे पकडली आणि मुंबईत गेलो. शिंदेसोबत नंतर गेलेले सर्व आमदार आणि मंत्री वर्षावर बसले होते. यात दादा भुसे, गुलाबराव पाटील, योगेश कदम, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि उदय सामंत होते. उदय सामंत हे सर्वात चलाख, ते सर्वात नंतर गेले, अशीही माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली.
आतापर्यंत बेधडक आणि बिनधास्त राजकारण केले. त्यामुळे राजकारणात मन रमत होतं. आता वयाची सत्तरी जवळ आली आहे. विरोधीपक्ष नेते पद पदरात पडेल असे वाटत होतं. विरोधीपक्ष नेता कसा असावा, हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं. स्वतःचा स्वार्थ काही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत तरतूद आहे. विरोधीपक्ष नेता असा असला पाहिजे समोर सत्ताधारी कितीही बलाढ्य असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची ताकद असेल तो विरोधीपक्ष नेता असला पाहिजे. तर सरकार चांगलं चालतं आणि राज्य चांगलं चालतं, वैधानिक काम कसे करायचं हे सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचं आहे. परंतु, सत्ताधारी पक्ष मला घाबरत आहे. ते मला घाबरत असल्याचा मला आनंद होत आहे. नैराश्य येत नाही असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.