शहरातील नोंदणीकृत ८२० झोपड्यांचे पुनर्वसन करण्यासाठी साळवी स्टॉप येथे झोपडीपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे बांधून देण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लवकरच प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी एका संस्थेबरोबर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांविषयीचा आढावा घेतल्यानंतर मंत्री सामंत यांनी दूरदृश्यप्रणालिद्वारे आयोजित पत्रकारांशी संवाद साधला. रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबत ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. त्याची दखल पालकमंत्री सामंत यांनीही घेतली आहे. त्याविषयी पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी एका खासगी संस्थेबरोबर काल चर्चा झाली आहे.
त्यांच्या सहकायनि रत्नागिरीत पायलट प्रकल्प राबविली जाणार आहे. तो यशस्वी झाला तर अन्य शहरांमध्येही त्याची अंमलबाजवणी केली जाईल. तत्पूर्वी रत्नागिरी शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांपैकी अनेक गुरांचे मालक आहेत. त्यांचाही शोध पालिकेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. त्यांच्याशी संवाद साधून ती गुरे रस्त्यावर फिरणार नाहीत, याची काळजी घ्या अशा सूचना केल्या जातील. तसे झाले, तर गुरे रस्त्यावरुन कमी होतील. परंतु, त्या मालकांनी ऐकले नाही, तर गुन्हा त्यांच्यावर दाखल करता येऊ शकतो. त्यापूर्वी पालिकेमार्फत गुरांच्या मालकांची यादी तयार केली जाणार आहे. त्याबरोबरच मोकाट गुरांवर काम करणाऱ्या संस्थेशी येत्या रविवारी बैठक आयोजित केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेसाठी १८ हजार ८१४ पैकी १८ हजार ५०५ प्रकरणे मंजूर झाली आहेत. मागील वर्षभरात त्यातील ३८१ घरे पूर्ण झाली आहेत.
आतापर्यंत विविध आवास योजनेतून जिल्ह्यातील १५ हजार लोकांना घरे बांधून दिली आहेत. ध्यानकेंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून, फेब्रुवारीत लोकार्पण होईल. रत्नागिरी शहरातील अनधिकृत फलकांवरील कारवाईमुळे शहर सुंदर दिसत आहे. आतातपर्यंत २९९ पैकी ११९ फलक शिल्लक आहेत. दुभाजकांमधील फलकांची मुदत तीन महिने शिल्लक असल्याने त्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील स्थितीचा आढावा घेण्यात आला असून, रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येणार आहेत. पुढील वर्षभरात संगमेश्वर टप्प्यातील रखडलेले काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच रत्नागिरी शहरात ८२० नोंदणीकृत झोपड्या असून, झोपडीपट्टी पुनर्वसन योजनेतून साळवी स्टॉप येथील जागेत एक हजार घरे उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान आवस योजनेतून प्रस्ताव तयार केला जात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्याने येत्या काही दिवसात पालिकेमार्फत हा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंडणगडला सरन्यायाधीश येणार – मंडणगड येथील न्यायालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी देशाचे सरन्यायाधीश येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी प्रथमच सरन्यायाधीशांची उपस्थिती राहणार आहे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.