गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला असला तरीही वेगवान वाऱ्यासह अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे पाली ते करंजारीदरम्यान ११ केव्ही करंजारी फिडरवर कशेळीत भलेमोठे झाड कोसळल्याने विद्युतवाहिनी तुटली आहे. त्यामुळे करंजारी फिडरवरील नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण येण्याची शक्यता वर्तवली आहे. २५ जूनपर्यंतचा इशारा दिला असून, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवाकेंद्राने (आयएनसीओआयएस) सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी २३.८४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड ९.५०, खेड ३०.८५, दापोली ११.७१, चिपळूण १८.४४, गुहागर २१.२०, संगमेश्वर ३०.७५, रत्नागिरी २१.४४, लांजा ३१.६०, राजापूर २७ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसांत वेगवान वाऱ्यांसह अधूनमधून पडणाऱ्या सरींनी रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पाली ते करंजारीदरम्यान कशेळी पुलाजवळ ११ केव्ही फिडरवर भलेमोठे जांभळीचे झाड कोसळले. त्यामुळे विद्युतवाहिनी तुटली असून, करंजारी फिडरवर अवलंबून असलेल्या ९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय झालेली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कशेळी, नाणीज, चोरवणे, करंजारी, घाटीवळे, जंगलवाडी, देवळे, मेघी आणि चाफवली या गावांचा विद्युतपुरवठा ठप्प झालेला आहे. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे हे झाड कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून, तुटलेली वीजवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.
झाड कोसळल्यामुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला होता; मात्र वाहतूक पूर्ववत झाली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच समुद्राला उधाण येणार असून, उंच लाटा किनाऱ्यावर फुटण्याची शक्यता वर्तवली आहे. लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. यंदा मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे पेरण्या रखडण्याची भीती होती; परंतु पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पेरण्यांना उशीर झाल्याने भातलावणीचे वेळापत्रक लांबले.