ऐतिहासिक वारसा आणि ठेवा असलेल्या नाटे येथील घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम हे अत्यंत दर्जेदार होईल. याची पूर्तता ठरल्याप्रमाणे व्हावी यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिनिधींचा सहभाग असलेली एक समिती गठित करून हे काम पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. या वेळी स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी यांनी मांडलेल्या सूचना आणि सुचवलेले बदल याप्रमाणेच हे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तालुक्यातील नाटे येथील पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेल्या घेरा यशवंतगडाच्या डागडुजी व दुरुस्तीचे काम शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे; मात्र हे काम सुरू असतानाच यावर्षीच्या पहिल्याच पावसात या किल्ल्याची नव्याने बांधलेली संरक्षण भिंतच ढासळली. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले व शिवप्रेमींसह स्थानिकांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर अनेकांनी या किल्ल्याला भेट देत या कामाची पाहणी करत याबाबत प्रशासनाला निवेदन दिले.
या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांनी या किल्ल्याला भेट दिली. या वेळी अशफाक हाजु, दीपक नागले, रवींद्र नागरेकर, हनिफ काझी, सरफराज काझी, जितेंद्र खामकर, तहसीलदार विकास गंबरे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विकास वहाणे, अनिल ओटवणेकर, मुकेश जाधव आदींसह स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते. या वेळी आमदार सामंत यांनी या किल्ल्याच्या कोसळलेल्या भिंतीची आणि किल्ल्याच्या आतील परिसराची पाहणी केल्यानंतर सदरची भिंत पुन्हा कशा पद्धतीने उभारता येईल याबाबत चर्चा केली. या वेळी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमींनी किल्ल्याचे दुरुस्ती व डागडुजीचे काम योग्य पद्धतीने केले जात नसल्याच्या तक्रारी केल्या.
नाटेचे सरपंच संदीप बांदकर, रमेश लांजेकर, संतोष चव्हाण, मनोज आडविलकर, मलिक गडकरी, विनायक कदम, अजित नारकर आदींनी मते मांडली. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला दगड हा निकृष्ट दर्जाचा असून, यापुढे स्थानिक ग्रामस्थ व शिवप्रेमी यांनी सूचित केलेला त्या साईजचा दगड बांधकामासाठी वापरावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. किल्ल्याच्या दुरुस्ती कामाचा दर्जा आणि कामाची पूर्तता ठरलेल्याप्रमाणे व्हावी यासाठी तहसीलदार विकास गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत या भागातील स्थानिक पाच प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांना माहिती देऊन काम करण्याच्या सूचनाही आमदार सामंत यांनी दिल्या.
स्थानिकांना विश्वासात घ्या – काम करणारी प्रशासकीय यंत्रणा व ठेकेदाराकडून स्थानिकांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. तसेच या कामासाठी वापरण्यात आलेले चिरे, वाळू व अन्य साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असल्याचेही ग्रामस्थांनी आमदारांना सांगितले. या वेळी आमदार सामंत यांनी अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरताना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना केल्या.