पुराच्या भीतीने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे कामकाज शिवाजीनगर येथील बसस्थानकावर हलवण्यात आले आहे. एसटीचे सर्व अधिकारी शिवाजीनगर वैथून कामकाज करणार असले तरीही एसटीच्या फेऱ्या मात्र मध्यवर्ती बसस्थानकातूनच सुटणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चिपळूण शहरात पुराचे पाणी भरल्यानंतर प्रथम मध्यवर्ती बसस्थानकात पाणी शिरते. मागील पाच वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानकात पाणी आले होते. किमान दोन ते अडीच फूट पाणी भरल्यानंतर एसटीच्या फेऱ्या चालवणे अवघड होते. महापूर आला तर कार्यालयातील दस्तऐवज आणि इतर साहित्याचेही नुकसान होते. २०२१च्या महापुरामध्ये एसटीचे मोठे नुकसान झाले.
तेव्हापासून एसटीच्या अधिकाऱ्यांनी धडा घेतला असून, पूर येण्यापूर्वी साहित्य आणि एसटीचे कामकाज सुरक्षित ठिकाणी नेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शिवाजीनगर येथील बसस्थानकाचा पर्याय निवडण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या पूर्वी शिवाजीनगर बसस्थानकावर जात होत्या. त्यानंतर त्या पुढे मार्गस्थ होत होत्या तसेच मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बस शिवाजीनगर बसस्थानकावर जात होत्या. आता मात्र सर्वच एसटीच्या फेऱ्या या शिवाजीनगर बसस्थानकावरून सुटणार आहेत. त्यानंतर त्या मध्यवर्ती बसस्थानकावर जातील आणि तेथून ठरलेल्या मार्गावर जातील. मध्यवर्ती बसस्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर किमान १५० ते २०० गाड्या लागतील एवढी मोठी जागा आहे. पावसाळ्याचे चार महिने हा बदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.