पाटबंधारे विभागाच्या ४९ पूर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टरांवर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजूनही १७ धरण प्रकल्प अपूर्ण आहे. त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने शासनाकडे २ हजार ५०० कोटींच्या निधीची मागणी केली. २०३१ पर्यंत हे सर्व धरण प्रकल्प पूर्ण होतील. जिल्ह्यातील २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून, भविष्यात ४५ हजार हेक्टरांवर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिली. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्याच्यादृष्टीने पाटबंधारे विभागाचा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात मध्यम, लघु धरण प्रकल्प सुरू आहेत, तर काही पूर्ण झालेले आहेत.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ४९ धरण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांमुळे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या प्रकल्पामधून पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जात आहे; परंतु गटशेती योजनेसाठी मात्र पाण्याचा अगदी नगण्य वापर होत आहे. तो वाढावा यासाठी पाटबंधारे विभागा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यात या विभागाचे अजून १७ धरण प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. यातील ७ प्रकल्प-दोन वर्षांमध्ये पूर्ण होतील, तर उर्वरित प्रकल्प २०३१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या १७ धरण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे ४१३ मिलियन क्युबिक मीटर पाणीसाठा निर्माण होणार आहे. या धरणांची २० ते ३० टक्क्यांच्या वर कामे पूर्ण झाल्यामुळे जून २०२५ अखेर या धरणांमध्ये २६६ मिलियन क्युबिक मीटरएवढा पाणीसाठा झाला आहे.
शासनाकडून पाटबंधारे विभागासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून निधी खर्चही होतो. साधारण यावर्षी २६० कोटीची तरतूद आहे. जिल्ह्यात नवीन कोणताही धरण प्रकल्प नाही; चिपळूण-सुतारवाडी येथे एक नियोजित आहे; – परंतु तो जुनाच आहे. पुनर्वसनाबाबत काही प्रश्न आहेत. पुनर्वसन आणि भूसंपादनाचे जिल्ह्यातील काम खूप चांगले आहे, असे सुर्वे यांनी सांगितले.
अभ्यास आणि शास्त्रीय पद्धतीनेच पूररेषा – जिल्ह्यातील चिपळूण आणि राजापूरच्या पूररेषेबाबत सुर्वे म्हणाले की, पूररेषा निश्चित करताना खूप अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने केली जाते. साधारण १०० वर्षांतील पुरांचा अभ्यास करून रेड आणि ब्ल्यू या दोन पूररेषा निश्चित केल्या जातात. याचे फेरसर्वेक्षण करून जरी पूररेषा निश्चित करायचे म्हटले, तर त्यामध्ये फारसा बदल होईल असे वाटत नाही. कारण, आम्ही अभ्यासपूर्ण या पूररेषा निश्चित केल्या आहेत.