गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी रो-रो बोट सेवा सुरु करण्याचा मानस मत्स्य, बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी केला खरा, पण ही रो-रो बोट थांबण्यासाठी मालवण, रत्नागिरीत जेट्टीच उपलब्ध नसल्याने रो-रो सेवेचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समस्त कोकणवासियांना वेध लागलेत ते गणेशोत्सवाचे. दरवर्षी या सणाला लाखो कोकणवासिय मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी येऊन गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करतात. यावेळी कोकणवासियांना थेट रो-रो बोट सेवेने मुंबई ते मालवण असा प्रवास करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत न सापडता चाकरमानी थेट मुंबईहून बोटीने कोकणात जाण्याची प्रतीक्षा करु लागलेला आहे. ही बोट सेवा गणेशोत्सवापर्यंत सुरु करण्याचा मानस सरकारचा आहे.
मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र या प्रवासी बोटीसाठी जेट्टीची उभारणी होणे गरजेचे आहे. त्या जेट्टी तयार झाल्या की ही बोटसेवा सुरु होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना दिली आहे. रत्नागिरीला अद्यापही जेट्टी तयार करण्यात आलेली नाही. तर जयगडमध्ये जेट्टी आहे. तिथे रो रोची बोट लागण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. त्यामुळे जेट्टीच नसल्याने रो-रोचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.