मिरकरवाडा बंदरात मासळी खरेदी करणाऱ्या परप्रांतीय पुरवठादार व्यापाऱ्यांनी स्थानिक मासळी खरेदी करून विकणाऱ्या नौकामालक आणि छोट्या तीस व्यापाऱ्यांचे सुमारे चार कोटी थकवले आहेत. हे व्यापारी मिरकरवाडा फिश सप्लाय असोसिएशनचे सदस्य आहेत; परंतु असोसिएशन स्थानिक नौकामालकांना पैसे मिळवून देण्यासाठी सहकार्यच करत नाहीत. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी स्थानिक नौकामालकांना फसवले आहे. त्यांना पुढील मासेमारी हंगामात मिरकरवाडा बंदरावर मासळी खरेदी करू देणार नाही, असा इशारा रत्नागिरी मच्छीमार खलाशी कामगार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष समीर वस्ता यांनी दिला. मिरकरवाडा बंदर हे मोठे बंदर असल्याने मासेमारी हंगामात दरवर्षी शेकडो मासळी पुरवठादार व्यापारी येत येतात. मेंगलोर, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यांतून शेकडो व्यापारी बंदरात येऊन मासळी खरेदी करून परप्रांतात पाठवतात.
हे व्यापारी मिरकरवाडा फिश सप्लायर्स असोसिएशनचे दरवर्षी पाच हजार रुपये शुल्क भरून सदस्य होतात. यातील काही व्यापाऱ्यांनी अनेक नौकामालकांचे लाखो रुपये द्यायचे ठेवले आहेत. या व्यापाऱ्यांशी मोबाईलवर संपर्कही होत नसल्याचे वस्ता यांनी सांगितले. पावसाळी मासेमारी बंदी एक जूनपासून सुरू झाली. हंगामातील शेवटच्या पंधरा दिवसांत खरेदी केलेल्या मासळीचे पैसे दिलेले नाहीत. नौकामालकांबरोबरच खलाशीही अडचणीत आले आहेत. गुरुवारी अनेक खलाशांनी भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष समद मजगावकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी संपर्क साधतो, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा वस्ता यांचा आरोप आहे. त्यामुळे आता फसवून गेलेल्या परप्रांतीय मासळी पुरवठादार व्यापाऱ्यांना मिरकरवाडा बंदरात यापुढे मासळी खरेदी करू देणार नाही, असा इशारा वस्ता यांनी दिला आहे.
असोसिएशनने पुढाकार घ्यावा – स्थानिक मच्छीमारांचे ज्या परप्रांतीय मासळी पुरवठादार व्यापाऱ्यांनी पैसे थकवले आहेत त्यांना मिरकरवाडा बंदरात येण्यासच मज्जाव करावा. जेणे करून त्यांना मच्छीमारांच्या आर्थिक अडचणीची जाणीव होईल. मिरकरवाडा फिश सप्लायर असोसिएशनने पुढाकार घेऊन स्थानिक मच्छीमारांचे पैसे मिळवून देण्यास मदत करावी, असे आवाहन रत्नागिरी मच्छीमार खलाशी, कामगार कल्याणकारी संघटनेने केले आहे.
दृष्टिक्षेपात… – कर्ज घेऊन नौका बांधलेल्यांचे हप्ते थकले. एकेकाचे १५ ते ३० लाख अडकले. एकूण ३० नौकामालक सप्लायर. मालकांनी खलाश्यांचे पगार थकवले. अनेक खलाशी गावी जाण्यापासून वंचित