मनसैनिकांची आक्रमक भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची ठरली. खत मिळत नसल्याने कुलुप लावण्यास गेलेल्या मनसैनिकांना खत उपलब्ध झाल्याचे कळताच त्यांनी कृषीअधिकाऱ्यांचा सत्कार केला. दरम्यान तब्बल अडीचशे टन खत चिपळूण तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आले असून विभागवार खत रवानाही झाले आहे. तालुक्यात भातशेतीला आवश्यक असणारे खत लावणी सुरू झाली तरी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. शेतीची कामे खोळंबली होती. या संदर्भात मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आक्रमक भूमिका घेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी मनसैनिकांनी जोरदार हंगामा केला होता. जर २७ जूनपर्यंत खत उपलब्ध झाले नाही, तर कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा आक्रमक इशारा दिला होता.
ठरल्याप्रमाणे शुक्रवारी २७ जून ला खतासंदर्भात मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले, तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, मिलिंद कदम, सागर चिले, संजय वाजे, भाई सुर्वे, प्रशांत हटकर, शुभम कदम, गणेश खेडेकर, अभिजित धोत्रे, अजय वाजे, गजानन राक्षे, सागर गांधी, सुनील घाडगे, मंगेश महाडिक आदी पदाधिकारी’ आणि मनसैनिक कृषी कार्यालयावर कुलुप आणि सत्कारासाठी शाल आणि पुष्पहार घेऊन पोहचले. यावेळी कृषीअधिकारी शत्रुघ्न मेहत्रे यांना वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आम्हाला खत आले की नाही सांगा. आले नसेल तर कुलुप लावणार, यासाठी हे कुलुप घेऊन आलो आहोत आणि जर खत आले असेल तर आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू यासाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ घेऊन आलो असल्याचे सांगितले. यावेळी कृषीअधिकाऱ्यांनी सर्वांना बसण्याची विनंती केली.
यावेळी कृषिअधिकारी मेहत्रे यांनी सांगितले की, तालुक्यासाठी २५७ टन खत आले आहे आणि हे खत आम्ही विभागवार असणाऱ्या सहकारी सोसायटी यांच्याकडे शेतकऱ्यांना वाटपासाठी सुपूर्द केले आहे. कुठे कुठे खत पाठविले याची कागदोपत्री माहितीही उपलब्ध करून दिली. यावेळी मनसैनिकानी तालुका कृषीअधिकारी शत्रुघ्न मेहत्रे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राजू खेतले यांनी आम्ही आमच्यासाठी तुमच्यासोबत वाद घातला नाही. शेतकरी आज समाधानी होऊन शेतात गेला असेल तो तुमच्यामुळे. हेच खत वेळेत आले असते तर बरे झाले असते, असे सांगून खत उपलब्ध केलेत याबद्दल आम्ही मनसेच्यावतीने आपले आभार व्यक्त करतो, असे सांगितले.