२०१८ पासून कार्यरत असलेल्या या कंपनीची चकचकीत कार्यालये चिपळूण, गुहागर, पुणे अशा ठिकाणी उभी आहेत. चिपळूणच्या गुहागर बायपास रोडवरील कार्यालयातही मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. १ लाख रुपये गुंतवणुकीवर महिन्याला ५ हजार रुपये आणि पुढे ३ हजार रुपये असा व्याज दिला जात होता. २५ लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना महिन्याला ५ टक्के परतावा आणि त्यांना ‘बिझनेस पार्टनर’ म्हणून सामावून घेण्याचा प्रयोगही कंपनीने राबवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून परतावा मिळणे बंद झाले आहे. कंपनीच्या हेल्थ आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कंपनीच्या मुख्य संचालकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. ते फोन उचलत नसल्याने अधिकच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालय व्यवस्थापकही नॉट रिचेबल असल्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान, दोघा गुंतवणूकदारांचे आपली व्यथा मांडणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. कर्ज काढून गुंतवणूक केली; पण आता परतावा मिळत नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपल्यावर मोठे संकट ओढवले आहे, असे त्यांनी नमूद केले. या व्हिडिओमुळे समाजमाध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे. कंपनीकडून सिंगापूरमधून शेकडो कोटी रुपये येणार असल्याचे आश्वासन दिले जात असले तरी त्याबाबत कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाईसाठी गुंतवणूकदार एकत्र येण्याची शक्यता असून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्याचा विचार सुरू झाला आहे.