जिल्ह्यात अमली पदार्थाविरोधात पोलिसांनी दोन कारवाया केल्या. रत्नागिरीमध्ये सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ब्राऊन शूगर टर्की पावडर व चौदा हजारांचा गांजा हे अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि अलोरे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जूनला पथक रत्नागिरी शहराच्या हद्दीमध्ये माळनाका ते एसटी कॉलनी जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करत होते. पोलिस दप्तरी नोंद असलेला गुन्हेगार मोटारसायकल घेऊन संशयित हालचाली करत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता कोणता तरी अमली पदार्थ असण्याची शक्यता असल्याचे त्याच्या ताब्यातील साहित्यावरून स्पष्ट झाले. दोन पंचांसमक्ष चौकशी केली तेव्हा पिशवीमध्ये ब्राऊन शूगर टर्कीसदृश अमली पदार्थाच्या ८ ग्रॅम वजनाच्या एकूण ८८ पुड्या मिळून आल्या. या प्रकरणी अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ४४ हजारांचा ब्राऊन शूगर टकी व दुचाकी असा एकूण १ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, पोलिस हवालदार सुभाष भागणे, बाळू पालकर, अमित कदम, गणेश सावंत, प्रवीण खांद, दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुसरी कारवाई अलोरे (ता. चिपळूण) पोलिसांनी केली. अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक भरत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून, पोफळी टीआरटी (धनगरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एकजण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पाटील यांनी पथक तयार केले. पथकाने गांजा विक्री करणारा संजय राया खरात (वय ३९, रा. पोफळी टीआरटी, धनगरवाडी, ता. चिपळूण) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४ हजारांचा गांजा हा अमली पदार्थ जप्त केला. अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.