ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार ४५४ रेशनकार्ड रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांचा समावेश आहे. ही कारवाई टाळण्यासाठी शासनाने कार्डधारकांना आणखी एक संधी दिली आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र अॅप आणले आहे. आधार फेस आयडी सेवा अॅप, असे त्याचे नाव आहे. त्यामुळे घरबसल्या कधीही आणि कुठेही तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी हे अॅप डाउनलोड करून कारवाईपासून सुटका मिळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे. रेशनकार्ड लिंकिंगची पडताळणी केल्याने फसवणूक दूर होण्यास आणि अन्न, धान्य वितरणात पारदर्शकता राखण्यास मदत होते. त्यासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यासाठी कार्डधारकांना वारंवार आवाहन करून देखील मोठ्या प्रमाणात कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही.
जिल्ह्यातील ३ लाख ३ हजार ४५४ रेशन कार्डधारक आहेत. यामध्ये ३४ हजार ९०४ अंत्योदय अन्नधान्य कार्डधारक आणि २ लाख ६८ हजार ५४७ प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांचा समावेश आहे. ई-केवायसीसाठी त्यांना ११ जुलैपर्यंत त्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर शासनस्तरावरूनच हे कार्ड आपोआप रद्द होणार आहे. जिल्ह्यात ही संख्या मोठी असल्याने कार्डधारकांना शासनाने आणखी एक संधी दिली आहे. ई-केवायसीसाठी शासनाने स्वतंत्र अॅप आणले आहे.
अशी करा ई-केवायसी पूर्ण – गुगल प्ले स्टोअरमध्ये आधार फेस आयडी सेवा अॅप शोधा व आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर मेरा ई-केवायसी मोबाईल अॅप इन्स्टॉल करा. अॅप उघडल्यानंतर राज्य निवडा व ठिकाण टाका. आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी मोबाईलला प्राप्त होईल. ओटीपी रकान्यात टाका. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणाला क्लिक करा. यावेळी मोबाईल स्क्रिनवर दिसणारी माहिती व्हेरीफाईड करा आणि सबमिट करा. त्यानंतर फेस ई-केवायसीवर क्लिक करा. सेल्फी कॅमेरा उघडल्यावर डोळे बंद करा व उघडा. फोटो काढून होताच ई-केवायसी पूर्ण होईल व त्याप्रमाणे आपणास मेसेज दिसेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होऊन कार्ड रद्द होण्याची कारवाई टळेल, असे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले.