तालुक्यात सलग दोन दिवस संततधार सुरू आहे. त्यामुळे अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीवरील धरणामध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला असून, दोन दिवसांमध्ये धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन राजापूर शहरासह नदीकिनाऱ्यावरील १३ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यात पडत असलेल्या जोरदार सरींनी अर्जना-कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परंतु, पूरस्थिती निर्माण झालेली नाही. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवान वाऱ्यामुळे धोपेश्वर ग्रामपंचायतीजवळील रस्त्यावर झाड पडले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली.
प्रशासनाने झाड तोडून रस्ता मोकळा केला. अर्जुना नदीवर पाचल येथे पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आलेल्या अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागातर्फे उपविभागीय अधिकारी आंबोळे यांनी नदीकाठावरील करक, तळवडे, पाचल, रायपाटण, चिखलगाव गोठणे दोनिवडे, शीळ, उन्हाळे, कोळवणखडी, सौंदळ, आडवली, परटवली, बागवेवाडी या गावांमधील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासन नागरिकांच्या संपर्कात – राजापूर तालुक्यात सलग दोन दिवस संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणातही ९० टक्के साठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदी किनारी असणाऱ्या नागरिकांशी थेट संपर्क सुरू केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी तातडीची मदत पोहोचवली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकेही तैनात करण्याची तयारी सुरू केली आहे.