आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन पुढील महिनाअखेरीस होणार आहे. त्यामुळे राजापूरमध्ये गणेशमूर्ती घडवण्यासाठी कार्यशाळांमध्ये आतापासून लगबग सुरू झालेली आहे; मात्र, बाजारपेठेत असलेल्या वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यात सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मूर्तिकारांसह गणेशभक्तांनाही सहन करावा लागणार आहे. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी आरास कशा पद्धतीची आणि कोणती करायची, याचे नियोजन आणि आराखडे बनवले जात आहेत. पुढील महिन्यात घरोघरी गणेशाचे आगमन होणार आहे. त्यामुळे श्री गणेशाची मूर्ती बनवण्यासह त्यांचे रंगकाम करण्याची लगबग गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये दिसत आहे.
गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या शाडूच्या मातीसह रंग आणि अन्य साहित्यांच्या दरात वाढ झाली आहे. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेली शाडूची माती कोकणात मिळत नाही. ती गुजरातसह अन्य भागांतून विकत आणावी लागते. सर्वसाधारणपणे ही माती किलोवर खरेदी न करता पोत्यावर केली जात असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रत्येक पोत्याच्या किमतीमध्ये ३०-३५ रुपये दराने वाढ झाली आहे. त्याबरोबरच वाढलेला वाहतूक खर्च आणि गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य यांच्याही किमती वाढल्या आहेत.