राज्यातील शेतकऱ्यांवर काय वेळ आली आहे हे सर्वांना माहिती आहेच; मात्र तशीच स्थिती हॉटेल व्यावसायिक व उद्योजकांवर येते की काय, असे वाढीव वीजबिलांमुळे दिसू लागले आहे. वीज नियामक आयोग घरगुती, उद्योजकांच्या वीजबिलाबाबत नवीन प्रयोग करत आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. कोकणातील पर्यटन फक्त कागदावर दिसत असून, प्रत्यक्षात ते खूप कमी आहे. वाढलेल्या वीजबिलांमुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते. व्यावसायिकांना शॉक बसला आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी ही दरवाढ थांबवावी, असे रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितले. वाढीव वीजबिलांबाबत जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रमेश कीर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी कीर म्हणाले, सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत, हा प्रश्न मला पडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल उद्योगाला व्यावसायिक दर्जा दिलेला नाही. आम्ही तुम्हाला उद्योगाचा दर्जा देतो, असे सांगितले; पण आजही महावितरणची बिले उद्योग व्यावसायिक दरानेच येत आहेत. हा अधिकचा भार पडतोय. याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मी वीजदर कमी केले; पण पुढील टप्प्यावरील दरवाढ बघून त्या ग्राहकांना फासावर चढवल्यासारखे दिसत आहे. याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि या आयोगाशी चर्चा करावी, असे कीर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे केशव भट, लघुउद्योग असोसिएशनचे दिगंबर मगदूम, शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर, उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे राज आंब्रे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर उपस्थित होते.