समाजसेवेसाठी आम्ही बांधील आहोत. एखाद्याने दिलेल्या तक्रारीनंतर त्यांना पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. तपासामध्ये काय प्रगती आहे, याची माहिती संबंधित तक्रारदाराला फोन किंवा व्हॉटस्अॅपवर कळवली जाणार आहे. यासाठी मिशन प्रगती अभियान राबवले जात आहे तर ज्येष्ठांना कोणतीही मदत लागली तर त्यांना तत्काळ मदतीसाठी मिशन प्रतिसाद राबवले जात आहे. पोलिस आणि जनतेचे संबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने दोन्ही मिशन नव्या जोमाने राबवण्याचा निर्णय दलाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. बगाटे म्हणाले, गृहविभागाच्या नव्या कायद्यानुसार पोलिस ठाण्यात तक्रार देणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला तपासाबाबत काय प्रगती आहे, हे पाहण्यासाठी पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत; परंतु आता मिशन प्रगतीमध्ये घरबसल्या तक्रारदाराला केसबाबत अपडेट मिळणार आहे.
संबंधित तपास अंमलदाराकडून गुन्हा कोणत्या स्तरावर आहे ही माहिती मोबाईल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे दिली जाणार आहे. त्यावर वरिष्ठांचेही नियंत्रण असणार आहे. यामुळे पोलिसदलाचा कारभार अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. मिशन प्रतिसाद हे देखील तेवढ्याच प्रभावी राबवण्यात येणार आहे. यामध्ये ज्येष्ठांसाठी ९६८४ ७०८३१६, ८३९०९२९१०० हे दोन हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. ज्येष्ठांना घरगुती काही अडचण असेल किंवा त्यांना छळ होत असेल, उपचारासाठी मदत हवी असेल अशा कोणत्याही मदतीसाठी पोलिसदल तत्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे. तिथे पोहोचल्याबाबत फोटो घेऊन त्यांना काय मदत केली, याचाही फोटो संबंधित यंत्रणेकडून प्रतिसाद घेतला जाणार आहे. यापूर्वी देखील ही यंत्रणा होती; परंतु त्याला नवऊर्जा देण्याचे काम आम्ही करत आहोत. आपले सरकार पोर्टलवर गृहविभागाच्या १७ सेवा ऑनलाइन आहेत; परंतु त्याची जनजागृती नसल्याने त्याला फार कमी प्रतिसाद मिळतो.
पोलिस ठाणे, अधिकाऱ्यांना नवे फोन – पोलिस ठाण्याचे जुने लॅण्डलाईन फोन लागत नाहीत किंवा लागले तर वरिष्ठांकडे ते दिले जात नाहीत, अशा तक्रारी होत्या. अधिवेशनामध्ये भास्कर जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाणे आदींना नवीन वायरलेस फोन देण्यात आले आहेत. यापुढे हे फोन नंबर संबंधित अधिकाऱ्यांना आणि पोलिस ठाण्यात कायम राहणार आहेत.