महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या आदेशाने एमबीबीएस व पदवीधर डॉक्टरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण राज्यात शुक्रवारी हॉस्पिटल बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हातील डॉक्टरही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी खाजगी रुग्णालय बंद राहणार आहेत. २४ तासांच्या बंदने न्याय मिळाला नाही तर. १९ जुलै रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाने एमबीबीएस व पदवीधर डॉक्टर यांच्यामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने शासनस्तरावर निवेदन देऊन बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून एमबीबीएस शिक्षणाच्या तुलनेत अत्यंत तोकडा अभ्यासक्रम असणाऱ्या होमिओपॅथीना नोंदणी देणे म्हणजे एमबीबीएस शिक्षणाचा अपमान आहे, अशी त्यांची भावना आहे. कोणतीही वैदयकीय कार्यक्षमता किंवा आधुनिक ‘वैदयकीय शास्त्राची सखोल समज प्राप्त नसणाऱ्यांना एमएमसीमध्ये नोंदणी देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे. मात्र या संदर्भात कोणताही निर्णय न झाल्याने एमबीबीएस आणि पदवीधर डॉक्टरांनी शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यात खाजगी हॉस्पिटल, क्लिनिक, लॅब डायग्नोस्टिक सेंटर असे सारे बंद राहणार असून शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत हा बंद असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार असून एमबीबीएस आणि पदवीधर डॉक्टर आणि त्यांचे क्लिनिक, दवाखाने बंद राहणार आहेत. या संदर्भात डॉ. अब्बास जबले यांनी सांगितले की, साध्या ग्रामीण शब्दात सांगायचे झाले तर ज्याला गाडी चालवायला येते त्याला थेट विमान चालवायला देणे, असा प्रकार असून यामुळेच आम्ही हा बंद करणार आहोत. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर १९ जुलै रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याचे सांगून शुक्रवारच्या बंदमध्ये इमर्जन्सी रुग्ण आणि ज्यांच्या जीवाला धोका आहे, असे रुग्ण यांनाच फक्त सेवा देण्यात येणार आहे.