दादर – रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे बंद करून गोरखपूर, बलिया अशा सुरू झालेल्या रेल्वे गाड्या, कोकण रेल्वेचे काही मिनिटात फुल होणारे आरक्षण, चिपळूण-पनवेल रेल्वेची मागणी, असे अनेक प्रश्न उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास हजारो लोकांना घेऊन रेल्वे ट्रॅकवर उतरेन, असा सज्जड इशारा देखील आम. जाधवांनी बैठकीत दिला. कोकणातील रेल्वे प्रवाशांवर होत असलेले अन्याय आणि प्रवासादरम्यान सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा याबाबत मुंबई येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांनी आवाज उठवला. परंतु एवढ्यावरच समाधान न मानता त्यानी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरूवारी ही बैठक पार पडली. बैठकीला मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर – या बैठकीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि बलिया येथे जाणाऱ्या गाड्या सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद करण्यात आल्याचा मुद्दा आमदार जाधव यांनी उपस्थित केला. त्यावेळी दादर वरून उत्तर प्रदेश व अन्य ठिकाणी जाण्यासाठी नवनवीन गाड्या सुरू करण्यात आल्याचे कळताच आम. जाधव रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर संतापले. तसेच ही गाडी दादर येथून पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर पनवेल ते चिपळूण या दरम्याने नवीन गाडी नियमित सुरू करावी, असा आग्रही त्यांनी केला.
आरक्षणाचा प्रकार काय ? – गणपती होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या पाच-सहा मिनिटात फुल होतात, हा काय प्रकार आहे, ऑनलाइन तिकीट काढण्याचा वेगळा सर्वर रेल्वेकडून एजंटांना तुम्ही दिला आहात का? आमदार जाधव यांच्या या प्रश्नांवर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. मग किमान रत्नागिरी आणि चिपळूण येथे आरक्षित तिकिटांचा कोटा वाढवून द्या, अशी मागणी केली.
रेलरोकोचा इशारा – गणपती सणासाठी दरवर्षीपेक्षा जादा गांड्या सोडण्यात याव्यात, आंजणी स्टेशनला हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे नाव देण्यात यावे यादेखील मागण्या आमदार श्री जाधव यांनी केल्या. यावर रेल्वेचे अधिकारी सकारात्मकता दाखवत नाहीत हे लक्षात येताच या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला, तेव्हा अधिकारी गंभीर झाले आणि आम्ही रेल्वे बोर्डाकडून या मागण्या मान्य करून घेऊ, असे आश्वासन दिले. परिवहनमंत्री ना. सरनाईक यांनीदेखील आमदार जाधव यांच्या मागणीनुसार ताबडतोब कार्यवाही करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मध्य रेल्वेचे प्रवींद्र वंजारी, शिवराज मानसपुरे, दीपक शर्मा आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.